नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:43 PM2024-10-08T13:43:34+5:302024-10-08T13:44:06+5:30
दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते.
हिंगोली : नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील १४४ तलावांपैकी १०९ तलाव सद्य:स्थितीला तुडुंब भरले आहेत. परतीचा पाऊसही आता थांबला असून, हेच पाणी उन्हाळ्यासाठी वापरावे लागणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये होणारा जलसाठा महत्त्वपूर्ण ठरतो. यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीला अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर अनेक भागांमध्ये परतीचा जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पातील पाणी आता रब्बी हंगामातील सिंचनासह उन्हाळ्यामधील पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणार आहे.
नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १०४ तलाव आहेत. त्यामध्ये दोन मोठे प्रकल्प, नऊ मध्यम प्रकल्प, नऊ उच्च पातळी बंधारे, ८० लघुप्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधाऱ्यांचा समावेश आहे. दोन्ही मोठे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. आठ मध्यम प्रकल्प आणि एक उच्चपातळी बंधारा, तर ८० पैकी ७० तलावांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एक मोठा प्रकल्प, २५ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण ९ प्रकल्प आहेत. त्यापैकी एक उच्च पातळी बंधारा आणि एक लघुप्रकल्प अशा दोनच प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प असून, त्यातही ७६ ते १०० टक्क्यांपर्यंतचा पाणीसाठा आहे.
१४४ पैकी १०९ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्हावासीयांची उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. परतीचा पाऊसही आता थांबला असून, या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यताही आता उरली नाही. त्यामुळे झालेला पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याची कसरत पाटबंधारे मंडळाला करावी लागणार आहे.
सात प्रकल्प अजूनही ज्योत्याखाली
परभणी जिल्ह्यातील एक, हिंगोली जिल्ह्यातील दोन, नांदेड जिल्ह्यातील चार अशा सात प्रकल्पांमध्ये अजूनही पाणीसाठा झाला नाही. या प्रकल्पातील पाणीसाठा सध्या जोत्याखाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती प्रकल्प १०० टक्के
नांदेड : ८१
हिंगोली : २६
परभणी : २
यवतमाळ : १