सुराणानगर दरोडा प्रकरणातील ११ आरोपींच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 03:26 PM2021-03-13T15:26:50+5:302021-03-13T15:30:25+5:30
घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच हे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथक चितळी, पुतळी, विरेगांव तांडा, पिंप्री डुकरे येथे पोहोचले.
हिंगोली : शहरालगत असलेल्या सुराणानगरातील राज्य राखीव दलातील जवानाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकून अडीच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना ७ मार्चच्या पहाटे घडली होती. पोलिसांनी यातील ११ आरोपींच्या मुसक्या आवळल्या तसेच आरोपीकडून सोने-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांसह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच हे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथक चितळी, पुतळी, विरेगांव तांडा, पिंप्री डुकरे येथे पोहोचले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. काही आरोपी नदी, नाल्यातून पळ काढत होते तर काही उसाच्या फडातही लपून बसले. मात्र, चितळी पुतळी, बाबई, कवठा येथील गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस पथकाने नदीतून दरोडेखोरांचा पाठलाग करत आराेपीला ताब्यात घेतले व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, सोन्या-चांदीचे दागिने, ३ एलईडी टी.व्ही, दुचाकी व पीकअप वाहन, असा १० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या घटनेतील अन्य एका मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. दरोडेखोरांकडून अन्य घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पथकात पोलीस कर्मचारी संतोष वाठोरे, भगवान आडे, संभाजी लेकूळे, गजानन पोकळे, अशोक धामणे, राजू ठाकूर, विठ्ठल काळे, शेख मोहम्मद , वाढवे, सायबर सेलचे नीलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, सुमित टाले, राहीत मुदीराज, रमा ठोके आदींचा समावेश होता.