जिल्ह्यात ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:45 AM2019-02-18T00:45:16+5:302019-02-18T00:45:34+5:30
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईवरून ओरड होताना दिसत आहे. सध्याच ११ टँकरने ९ गावांना पाणीपुरवठा केला जात असून जवळपास ३0 ते ३५ खेपा केल्या जात आहेत. तर अधिग्रहणांची संख्याही १८ वर पोहोचली आहे.
यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व सेनगाव हे तीन तालुके तर दुष्काळग्रस्तच जाहीर केले. या तालुक्यांतील टँकरचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांनाच दिलेले आहेत. तर इतर ठिकाणच्या उपायांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येतात. यंदा टंचाईची तीव्रता लक्षात घेता सध्याच ११ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यात कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु. या ठिकाणी तर सेनगाव तालुक्यातील जयपूर, सेनगाव, कहाकर खु., औंढा तालुक्यात काळापाणी तांडा आदी ठिकाणी टँकर सुरू झाले आहेत.
सेनगाव तालुक्यात ८ खाजगी टँकर सुरू असून १९ खेपा केल्या जात आहेत. यावर १४५७0 एवढ्या लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. कळमनुरी तालुक्यात १ खाजगी तर दोन शासकीय टँकरद्वारे ८ खेपा केल्या जात आहेत. यावर ४२१९ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे.
जिल्ह्यात एकूण १८ स्त्रोतांचे अधिग्रहण केले आहे. त्यातील टँकरसाठी ८ असून उर्वरित टँकरव्यतिरिक्त आहेत. मागील काही दिवसांपासून अधिग्रहणाचे प्रस्ताव येण्यास प्रारंभ झाला आहे. गतवर्षी अधिग्रहणाची रक्कम मिळण्यास विलंब झाल्याने अनेक शेतकरी आपला स्त्रोत अधिग्रहण करू देण्यास नकार देत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे काही गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा टंचाईची तीव्रता जास्त असल्याने लोकप्रतिनिधींनीही झपाट्याने कामाला लागले आहेत. ग्रामीण भागातून होणारी ओरड थांबविण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी गोंधळ झाला असला तरीही उपायांना त्या प्रमाणात गती मिळाल्याचे चित्र दिसत नाही. आता उन्हाचा कडाका वाढत असल्याने उपायांसाठी प्रशासनास सज्ज व्हावे लागणार आहे.