शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 04:06 PM2023-11-20T16:06:42+5:302023-11-20T16:07:13+5:30

वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारातील घटना

12 acres of sugarcane cut by short circuit; Millions of losses to farmers | शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

वसमत (जि. हिंगोली) : शाॅर्टसर्किटने बारा एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारात १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसमत तालुक्यातील रिधोरा शिवारात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही या शिवारात शेकडो हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास शिवारातील वीज रोहित्रात शाॅर्टसर्किट होऊन स्फोट झाला. त्यामुळे आगीच्या ठिणग्या उसात पडल्याने आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. शेतकऱ्यांनी वीज कंपनीला माहिती देत वीजपुरवठा बंद करण्यास सांगितला. परंतु, पाहता पाहता परिसरातील शेतकऱ्यांचा बारा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. शेतकरी चंद्रकांत भालेराव यांना घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. तर उपसरपंच प्रल्हाद भालेराव यांनी अग्निशमन दलास पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वसमत येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. परंतु, या घटनेत शेतकरी विश्वनाथ मुळे यांचा अडीच एकर, प्रभाकर भालेराव यांचा १ एकर, प्रल्हाद भालेराव ४ एकर, गोपीनाथ भालेराव यांचा २ एकर, नथूजी भालेराव यांचा ३ एकर, कृष्णा भालेराव यांचा २ एकर असा एकूण १२ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीज कंपनीने नुकसान भरपाई द्यावी...
महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नेहमीच बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज रोहित्राच्या ठिकाणी फुटलेले फ्यूज, उघडे पडलेल्या तारा असतात. रिधोरा शिवारातील वीज रोहित्राचीही अशीच परिस्थिती होती. शेतकऱ्यांनी अनेक वेळा दुरूस्तीची मागणी केली. परंतु, दुरुस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

३५ एकरावर होता ऊस...
रिधोरा शिवारात ज्या ठिकाणी शाॅर्टसर्किटने आग लागली त्या भागात जवळपास ३५ एकरावर ऊस उभा होता. त्यापैकी १२ एकरातील ऊस जळून खाक झाला. उर्वरित क्षेत्रावरील उसालाही झळ पोहोचली असून, सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळाले. अन्यथा सर्व ऊस जळून खाक झाला असता, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: 12 acres of sugarcane cut by short circuit; Millions of losses to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.