१२ लघु तलाव गेले जोत्याच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:48 AM2021-05-05T04:48:32+5:302021-05-05T04:48:32+5:30
हिंगोली : जिल्ह्यात एप्रिल अखेर १२ लघु तलाव जोत्याखाली गेले असून तरीही जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ६८ टक्के जलसाठा ...
हिंगोली : जिल्ह्यात एप्रिल अखेर १२ लघु तलाव जोत्याखाली गेले असून तरीही जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ६८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी जास्त आहे. आता मे महिना लागल्याने काही भागात टंचाई जाणवत असली तरीही दरवर्षी एवढी यंदा तीव्रता नाही.
हिंगोली जिल्ह्यात दोन मोठे तर २६ लघु तलाव आहेत. दोन मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी धरणात ६६२.२२ दलघमी पाणीसाठा असून उपयुक्त साठा ५३७.५ दलघमी एवढा आहे. हे प्रमाण ६६.३८ टक्के आहे. गतवर्षी यात ६९.६८ टक्के जलसाठा होता. तर सिद्धेश्वर धरणात १४२ दलघमी पाणीसाठा असला तरीही त्यात उपयुक्त साठा शिल्लक राहिला नाही. गतवर्षी मात्र या महिन्यात या धरणातील साठा ५० टक्क्यांवर होता. मागच्या वर्षी मार्चमध्ये लागलेल्या कडक टाळेबंदीमुळे शेतीचा व्यवसायच ठप्प होता. अनेकांना उन्हाळी पिके घेता आली नाहीत. त्याचा परिणाम म्हणून साठा घटला नव्हता. यंदा निर्बंधांमध्ये कृषीला शिथिलता असल्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
लघु तलावांपैकी हिंगोली तालुक्यातील पारोळा, वडद, हिरडी, पेडगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, औंढा, पुरजळ, वंजारवाडी, काकडदाबा, केळी हे बारा तलाव जोत्याखाली गेले आहेत. तर हिंगोली तालुक्यात चोरजवळा १ टक्का, सवड ७ टक्के, हातगाव ८ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना ९ टक्के, घोडदरी २६, पूर्णा तालुक्यातील मरसूळ ३ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी ३० टक्के, सुरेगाव ६ टक्के, पिंपळदरी २४ टक्के, कळमनुरी तालुक्यातील बोथी २२ टक्के, कळमनुरी २४ टक्के, दांडेगाव १९ टक्के, देवधरी २० टक्के, वसमत तालुक्यातील राजवाडी ९ टक्के असा जलसाठा आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये ६८ टक्के जलसाठा आहे. यात सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा येथे ७५ टक्के, खेर्डा येथे २२ टक्के, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथे १०० टक्के, परभणी तालुक्यातील रहाटी येथे ८१ टक्के जलसाठा आहे.