१२ हजार मतदारांना नाव वगळणीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:08+5:302021-06-17T04:21:08+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत मतदार यादी शुद्धिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यात जवळपास १२ हजार जणांचे फोटो ...
हिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत मतदार यादी शुद्धिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यात जवळपास १२ हजार जणांचे फोटो नसल्याने ते जमा करण्यात येत असून, ते न मिळाल्यास मतदार यादीतून नाव वगळण्यात येणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षणात मतदारांचे फोटो जमा करणे, दुबार नावे वगळणे, लॉजिकल त्रुटी दूर करणे, आदी कामे केली जात आहेत. फोटोसाठी संबंधितांच्या पत्त्यावर जाऊन विचारणा केली जाणार असून, तो न मिळाल्यास नाव वगळले जाणार आहे. निवडणूक आयुक्तांकडूनच तशा सूचना आहेत.
जिल्ह्यात ९ लाख २४ हजार ९३५ मतदार आहेत. यापैकी १२ हजार ३५८ जणांचे फोटो मतदार यादीत नाहीत. सध्या ४९४ जणांचे फोटो प्राप्त झाल्याने यादीत अद्ययावत झाले आहेत. ज्यांचे फोटो मतदार यादीत नाहीत, त्यांनी आपल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अथवा तहसीलच्या निवडणूक विभागात जमा करायचे आहेत. ज्यांचे फोटो मिळणार नाहीत, त्यांची नावे वगळली जातील.
वसमत सर्वांत अद्ययावत
वसमत विधानसभेत २ लाख ९९ हजार ८०२ मतदार आहेत. यापैकी ४०७ जणांचे फोटो नव्हते. २९० जणांनी ते दिले. आता ११७ जणच शिल्लक आहेत. कळमनुरीत ३ लाख ११ हजार ८३ मतदार आहेत. ३९३६ जणांचे फोटो नाहीत. यापैकी फक्त २८ जणांनी फोटो दिले आहेत. हिंगोलीतही ३ लाख १४ हजार ५० मतदारसंख्या आहे. यापैकी ८०१५ जणांचे फोटो नाहीत. १७६ जणांनीच ते दिले. ७८३९ शिल्लक आहेत. त्यामुळे हिंगोली व कळमनुरीतच वगळणीचा धोका जास्त आहे.