बारावीची परीक्षा रद्द ; अन्य प्रवेश कसे होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:42+5:302021-06-06T04:22:42+5:30
हिंगोली : दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी यानंतर पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, परीक्षेचे गुणदान कसे ...
हिंगोली : दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी यानंतर पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, परीक्षेचे गुणदान कसे होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पालकांनाही पाल्याच्या भविष्याविषयी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे यावर्षी शाळा , महाविद्यालये काही दिवस वगळता वर्षभर बंद ठेवावी लागली. रूग्ण संख्या वाढतच गेल्याने सुरवातीला पहिली ते आठवी व त्यानंतर नववी व अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली. दहावीची परीक्षाही शासनाने रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बारावीत चांगले गुण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात शिक्षणासाठी जातात. मात्र आता बारावी परीक्षेचे गुणदान कसे होणार, पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसत आहे. पालकही पाल्याच्या भवितव्याविषयी चिंतेत असून तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बारावीनंतरच्या संधी
- विद्यार्थ्यांना बारावीनंतर कला, वाणिज्य व विज्ञान पदवी सोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.
- या मध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीयूएमएस आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
- पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
- बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, अर्किटेक्चर, कृषी, पॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येतो.
प्राचार्य म्हणतात...
बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतच्या सूचना अद्याप मिळाल्या नाहीत. फार्मसीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयातील गुणाच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. सीईटी लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी होऊन प्रवेश प्रक्रीयाही सुरळीत होतील.
- दिनेश देशमुख, प्राचार्य, उत्तमराव देशमुख इंन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हिंगोली
कोरोना संसर्ग लक्षात घेता पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे उचित ठरेल. जास्त विद्यार्थी आल्यास काही गुणांची ऑनलाईन परीक्षा घेऊन प्रवेश निश्चित करता येतील. आता तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान लवकर होणे महत्वाचे आहे.
- डॉ. बी.जी. गायकवाड, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली
बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान लवकर झाल्यास विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरविता येईल. यात वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. पुढील अभ्यासक्रमाबाबतच्या प्रवेशाचे धोरणही निश्चित करावे.
- ज्ञानेश्वर मोरे, पालक
बारावीची परीक्षा वेळेवर होईल, यामुळे खूप अभ्यास केला होता. आता परीक्षा रद्द झाल्याने सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असले तरी गुणदान कसे होणार, पुढील प्रवेश कसे होणार याबाबत संभ्रम आहे. लवकर गुणदान व्हावे.
-दत्ता पोहनकर, विद्यार्थी
बारावीच्या निकालांसाठी गुणसूत्र काय ठरते याकडे लक्ष लागले आहे. गुणदानानंतरच कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा तो निर्णय घेता येईल. तसेच निकाल लागल्यावर तांत्रिक अडचण येऊ नयेत.
-गजानन बोरकर, विद्यार्थी
अकरावी, बारावीत खूप अभ्यास केला होता. त्याचे योग्य मू्ल्यमापन व्हावे. लवकर गुणदान झाले तर पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. तसेच पुढच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा लवकर व्हाव्यात.
- अश्विनी शिंदे, विद्यार्थीनी
जिल्ह्यातील बारावीतील एकूण विद्यार्थी - १४३४७
मुले -७९५०
मुली -६४३७