जिल्ह्यात आठ महिन्यांत १३ महिला विकृत वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:35 AM2021-09-17T04:35:33+5:302021-09-17T04:35:33+5:30
हिंगोली : लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना थोडासा ब्रेक लागला होता. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश ...
हिंगोली : लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना थोडासा ब्रेक लागला होता. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र आता पुन्हा अनलॉक झाल्यानंतर गुन्हेगारीने डोके वर काढले असून, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांतही काहीशी वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. मागील आठ महिन्यांत बलात्काराच्या १३ घटना घडल्या असून, २ महिलांचे अपहरण झाल्याची नोंद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह जिल्हाभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात पती-पत्नीमधील वादाचे प्रकार वगळता इतर गुन्ह्यांना ब्रेक लागला होता. चोरीच्या घटनांनाही आळा बसला होता. मात्र टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत होते. तसे गुन्हेगारीनेही डोके वर काढण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग आदी घटनांनी डोके वर काढले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांवरील प्रश्नांना प्रथम प्राधान्य दिले जात असले तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मागील आठ महिन्यांत १३ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला अजून ठोस निर्णय घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.
गतवर्षीच्या तुलनेत घट
जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा या वर्षी बलात्कार व अपहरणाच्या घटनांत घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०२० मध्ये हुंडाबळीच्या ५, बलात्काराच्या १६, विनयभंग ७४, महिला अत्याचाराच्या १९५ घटना घडल्या होत्या. तर या वर्षी आठ महिन्यांत २ महिलांचे अपहरण झाले. तर बलात्काराच्या १३ घटना घडल्या आहेत. या प्रकरणी त्या-त्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्याची नोंदही झाली आहे.
९ अल्पवयीन ठरल्या शिकार
जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवरही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात ९ मुली अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत प्रत्येकी एक, जून व जुलै महिन्यात प्रत्येकी दोन तर ऑगस्ट महिन्यातील एका घटनेचा समावेश आहे.
१९ मुलींचे अपहरण
जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत २४ अल्पवयीन बालकांचे अपहरण झाल्याची नोंद आहे. त्यात १९ मुलींचा समावेश आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात १, फेब्रुवारी ४, मार्च २, एप्रिल २, मे ३, जून १, जुलै ३ तर ऑगस्ट महिन्यात ३ मुलींचे अपहरण झाले आहे.
गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर तपासाला प्रथम प्राधान्य दिले जात असले तरी काही घटनांतील आरोपींचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. हिंगोली शहरातील काही घटनांतील आरोपींना लगेच अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत कामठा फाटा येथे घडलेल्या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तपासाची गती वाढविण्याची गरज आहे.