चोरी रोखण्यासाठी १३२ पोलीस ठाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:25 AM2018-03-07T00:25:20+5:302018-03-07T00:25:24+5:30
दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस वीजचोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वीजचोरीमुळे महावितरण तोट्यात चालली आहे. मोहीम व धडक कारवाई करूनही वीजचोरी वाढत चालली आहे. त्यामुळे आता वीजचोरी करणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. ज्या ठिकाणी वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, तेथील ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गृह विभागाने राज्यातील १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.
या संदर्भाचे परिपत्रकही गृह विभागाने २८ फेब्रुवारी रोजी काढले आहे. या १३२ पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील. मोठ्या शहरांमध्ये ५ पोलीस ठाण्यांना वीजचोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे ६ पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहेत.
वीजचोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे ३, हिंगोलीत ३, नांदेड ४ पोलीस ठाणे नाशिक ५, जालन्यात ३, परभणीत ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७ या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.
आकडेवारी : राज्यभरातील ठाण्यांची संख्या
पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलढाणा २, चंद्रपुर ३, गडचिरोली २, गोंदिया ३, जळगाव ४, कोल्हापूर जिल्हयात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, सांगली ३,
सातारा ३, सिंधुदुर्ग २, वर्धा २, वाशिम ३, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ७ पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती नांदेड परिमंडळातर्फे देण्यात आली आहे. याबाबत जागृतीही केली जात आहे.
कोणीही वीजचोरी करू नये, असे करताना आढळून आल्यास संबधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.