१४ हजार ६५४ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:52+5:302021-01-03T04:29:52+5:30

यासाठी अर्जदारास आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ असून यावरील शेतकरी ...

14 thousand 654 farmers registered on MahaDBT portal | १४ हजार ६५४ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

१४ हजार ६५४ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी

Next

यासाठी अर्जदारास आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ असून यावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. त्यावरून शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र आदींच्या माध्यमातून महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. आधार नसल्यास नोंदणी करता येणार नाही. आधार नोंदणी करून अर्ज करता येईल. तो प्रमाणित करून घेतल्याशिवाय मात्र महाडीबीटीवरून अनुदान मिळणार नाही.

असे आले अर्ज

एकूण बारा प्रकारात यावर अर्ज आले आहेत. ॲनिमल ऑपरेटेड मशिनरी १५१९, फार्म मशिनरी बँक २१, हाय प्राेडक्टिव्ह एक्विपमेंट १२, फलोत्पादन मशिनरी व एक्विपमेंट ६७, मॅन्युअल ऑपरेटेड मशिनरी १२०२, पोस्ट हार्वेस्ट टेक्नाॅलाॅजी २०३, पाॅवर टिलर १२२३, प्राेसेसिंग युनिट ३२६, सेल्फ प्राेपेल्ड मशिनरी ४५८, स्पेशलाईज्ड ॲग्री. मशिनरी ८१, ट्रॅक्टर ३६८९ तर मिनी ट्रॅक्टर ५८५३ असे अर्ज आले आहेत.

ट्रॅक्टरसाठीच वाढताहेत अर्ज

कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणाच्या या विविध योजनात चांगले अनुदान मिळत आहे. शिवाय शेतकऱ्यांचा कलही आता यांत्रिकीकरणाकडे वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी यात मोठ्या संख्येने अर्ज करू लागले आहेत. त्यातच पाॅवर टिलर, ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टर याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येत आहे. ७० ते ८० टक्के अर्ज या बाबींसाठीच आले असल्याचे दिसून येत आहे.

कृषी अधिकाऱ्याचा कोट

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम मिळणार आहे. तर विविध योजनांसाठी अर्जही तेथेच करता येणार आहे. लाॅटरीही ऑनलाईन निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कार्यालयात येऊन अर्ज करण्याची गरज राहिली नसून घरूनच ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

- विजय लोखंडे,

कृषी अधीक्षक अधिकारी

चांगले पण कठीण

शेतकऱ्यांना महाडीबीटीद्वारे यांत्रिकीकरणातील विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. थेट खात्यात रक्कम, अर्ज करायला कार्यालयात जाण्याची गरज नाही. मात्र इंटरनेटसह इतर अडचणींमुळे कठीण जात आहे. आता मुदत वाढली हे चांगले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. यात जास्त लाभार्थी कव्हर झाले पाहिजे.

- गणेश कावरखे,

शेतकरी

Web Title: 14 thousand 654 farmers registered on MahaDBT portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.