कृषी संजीवनीत शेतकऱ्यांचे १४ हजार अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:33+5:302021-08-22T04:32:33+5:30
हिंगोली : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला मंजुरीतील क्लिष्ट प्रक्रियेमुळे ...
हिंगोली : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला मंजुरीतील क्लिष्ट प्रक्रियेमुळे खीळ बसली आहे. तब्बल १४ हजार अर्ज मंजुरीसाठी पडून आहेत; तर स्थळ पाहणीत २० हजार अर्ज अडकले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात तीन टप्प्यांत २४० गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३९, दुसऱ्या टप्प्यात १२९, तर तिसऱ्या टप्प्यात ७२ गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माहितीसाठी गावोगाव शेतीशाळाही घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना यात नेमका कोणत्या योजनांचा काय व कसा फायदा घेता येईल, याची माहिती ४२८ शेतीशाळांतून दिली. तसेच या योजनेत शेतकऱ्यांना असलेल्या अनुदानाचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
या योजनेत तसे आतापर्यंत ९४ हजार ५६१ अर्ज आले आहेत. मात्र यापैकी ३६ हजार ४९३ अर्जांचीच नोंदणी झाली आहे. यापैकी ३६ हजार अर्जांची पडताळणीही पूर्ण झाली आहे. मात्र याला या योजनेसाठी नेमलेल्या समितीची मंजुरी आवश्यक असते. अशा मंजुरीत १४ हजार ७१४ अर्ज अडकून पडले आहेत, तर कृषी सहायकांनी स्थळ पाहणी करण्यासाठी २० हजार ३८८ अर्ज प्रलंबित आहेत. ३२१३ अर्ज तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांपर्यंत जाणाऱ्या अर्जांची संख्या अतिशय कमी असल्याचे दिसते. त्यातही तेथेही हे अर्ज प्रलंबित राहात असल्याने या योजनेतील कामांना खीळ बसली आहे.
शेतकऱ्यांना ही कामे मंजूर झाल्यानंतर ती करून त्यांनाच या कामांची देयके अपलोड करावी लागतात. अशा १० हजार ७५० कामांची देयके प्रलंबित आहेत; तर कृषी सहायकांनी मोका तपासणी करण्याची २४४९ कामे बाकी आहेत. लेखाधिकारी स्तरावर १८३, अंतिम मंजुरीसाठी २३९ कामांची देयके रखडली आहेत. आतापर्यंत १५ हजार ७१९ कामांना अनुदान वितरित झाले असून, ही रक्कम ४४ कोटी रुपये एवढी आहे. मुंबईच्या स्तरावरही आणखी ४८५ अर्ज प्रलंबित आहेत.
मृद व जलसंधारणाचीही तीच गत
मृद व जलसंधारणाची एकूण ४०६ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. १९.५२ कोटींची ही कामे आहेत. यापैकी ८.३० कोटींच्या २२१ कामांना तांत्रिक मंजुरी दिली; तर ५.३० कोटींच्या १५१ कामांची ई-निविदा निघाली आहे. या सर्व कामांचा कार्यारंभ आदेशही दिला. मात्र यातील १०९ कामेच पूर्ण झाली असून, यावर २.५२ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.