१४५२ शिक्षकांच्या बदल्या, ३७0 लटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:52 PM2018-05-28T23:52:59+5:302018-05-28T23:52:59+5:30
गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून त्यांना आता पुन्हा २0 पर्याय भरून द्यावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आॅनलाईन बदल्यांचा मुद्दा आज अखेर निकाली निघाला. एकूण १४५२ शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले असून त्यांना कार्यमुक्तही केले. तर जवळपास ३७0 शिक्षक त्यांनी दिलेल्या २0 पैकी एकही पर्याय उपलब्ध नसल्याने लटकले असून त्यांना आता पुन्हा २0 पर्याय भरून द्यावे लागणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण राज्यात शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. अनेकदा आॅनलाईन अर्ज केल्यानंतर अखेर ही प्रक्रिया यंदा शाळा सुरू होण्यापूर्वी यशस्वी झाली आहे. यामध्ये १९२४ प्राथमिक शिक्षक बदलीपात्र होते. तर पदवीधर शिक्षक २४३, मुख्याध्यापक १७९ अशा एकूण २३४६ जणांनी आॅनलाईन अर्ज सादर केले होते. यापैकी प्राथमिक शिक्षकांच्या १२१९, पदवीधर शिक्षकांच्या १४७ तर मुख्याध्यापकांच्या ८६ बदल्या झाल्या आहेत. एकूण १४५२ शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापकांच्या बदल्या झाल्या आहेत. एकूणच्या तुलनेत ६१.८९ टक्के जणांचे आदेश शासनाने रात्री अपलोड केले.या शिक्षकांना शिक्षण विभागाने कार्यमुक्तही केले आहे.
या बदल्यांमुळे आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक लटकले होते. आता त्यांना पुन्हा ३७0 शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
यामध्ये अनेक शिक्षकांनी शासन निर्णयाचा चांगलाच अभ्यास केला होता. अशांनी ठिकाणे निवडताना २0 मध्ये आपण असलेल्या परिसरातीलच मात्र आहे त्या तालुक्यातील, बाहेरच्या तालुक्यातील गावे निवडताना डोके वापरले. अशांना इतरत्र नव्हे, तर तालुक्यातच पुन्हा बदली मिळाली.
विशेष म्हणजे २५ किमीच्या फेऱ्यातच अनेक शिक्षकांना शाळा मिळाल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांना हे जमले नाही, अशांचा तालुकाही बदलला गेला मात्र अपेक्षित ठिकाण तेवढे मिळाले. त्यांना यातही आनंद मिळतोय, हे तेवढेच खरे.
बदली झालेल्या शिक्षक व मुख्याध्यापकांना संबधित केंद्र अंतर्गत येणाºया शाळांवर रूजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली
आनंदाचे वातावरण
दरम्यान, शिक्षकांना या बदल्या कोणताही खर्च न करता केवळ आॅनलाईन अर्जावर झाल्याचा मोठा आनंद वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये बहुतांश शिक्षक कोणतीही खळखळ न करता आपल्याला चांगले ठिकाण मिळल्याचे सांगत आहेत. बोटावर मोजण्याइतकेच मात्र खुप दूरचा पर्याय मिळाल्यासारखे बोलत आहेत. परंतु इतरांमुळे ते काही नाराजी व्यक्त करीत नाहीत.
विस्थापितांनी करावा फेरअर्ज
ज्या शिक्षकांनी २0 गावांच्या शाळांचे पर्याय दिल्यानंतरही बदल्या झाल्या नाहीत, अशा ३७0 शिक्षकांना आता पुन्हा आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अशा शिक्षकांसाठी पुन्हा वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यांनाही बदल्यांना सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. या लटकलेल्यांमध्ये बहुतांश महिला शिक्षिका आहेत. अवघड क्षेत्रातून त्यांना वगळले असले तरीही अनेकांनी शहरानजीकच्याच शाळांची दिलेली यादी अन् अपुरी पडलेली ज्येष्ठता यामुळे त्यांना शाळा मिळाल्या नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये बोंब दिसत आहे. तरीही आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडल्यामुळे अशांना एक तेवढी संधी आहे. मात्र त्यातूनही हुकल्यास मग मिळेल त्या ठिकाणीच जाण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे दिसत आहे. या रिक्त जागांवर आता अनेकजण नजर ठेवून असल्याचे दिसून येत आहे.