विहिरींवर १५ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:05 AM2018-10-02T01:05:16+5:302018-10-02T01:06:10+5:30
जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे.
हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत २६१७ सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. यामध्ये औंढ्यात ६५७, वसमत-२१३, हिंगोली-५९४, कळमनुरी- ४४१, सेनगाव-७१२ अशी तालुकानिहाय संख्या आहे. यात ४४ कोटी रुपयांचा मजुरीवर तर ३१ कोटी रुपयांचा बांधकाम साहित्यावर खर्च अपेक्षित आहे. यापैकी १४.४३ कोटी रुपये मजुरीवर आतापर्यंत खर्ची पडले आहेत. तर साहित्यावर केवळ ५१.३५ लाखांचा खर्च झाला आहे. यामध्ये २0१८-१९ या आर्थिक वर्षात औंढा ३.६३ कोटी, वसमत-७८ लाख, हिंगोली-४.५६ कोटी, कळमनुरी-२.६७ कोटी तर सेनगावात २.७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. साहित्यावर कमी खर्च दिसत असल्याने या विहिरी केवळ खोदकामातच असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वसमत तालुका सर्वात पिछाडीवर आहे. थोडीबहुत हिंगोली व सेनगावात बांधकामाची बरी स्थिती दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामांवरून मोठी ओरड कायम होत असते. पुढाऱ्यांच्या सभा यावरच गाजतात. मात्र प्रत्यक्षात मजुरांअभावी कामेच पुढे रेटत नसल्याचे चित्र आहे. यावर काहीच उपाय नसला तरीही नुसती भरमसाठ कामे सुरू करूनही उपयोग नसल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात ती पूर्ण होणेही अगत्याचे आहे. आतापर्यंत केवळ ११६ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याचे पंचायत समित्यांच्या अहवालावरून दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना अंमलात येत असताना ही संख्या काही समाधानकारक मानता येणार नाही. याला गती देण्याचे उपाय शोधणे गरजेचे आहे.
तीनच कामे पूर्ण : ९४१ झाली होती सुरू
हिंगोली जिल्ह्यात मग्रारोहयोत विविध प्रकारची ९४१ कामे २0१८-१९ या आर्थिक वर्षात हाती घेण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ तीन कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षातील उणीपुरी सात महिने हातची गेली. त्यातील चार महिने पावसाळ्याचे सोडले तरीही तीन महिन्यात तीनच कामे झाल्याचे दिसते.
या योजनेत मंजूर असलेल्या कामांची औंढा १८८, वसमत २0५, हिंगोली २२३, कळमनुरी-८५, सेनगाव २३९ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर हिंगोलीतील तीन कामे तेवढी पूर्ण झाली आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण 0.३२ टक्के आहे.
हिंगोली जिल्ह्यात २0१५ पासून आजपर्यंत १६१0२ कामांना मग्रारोहयोत प्रारंभ केला होता. यापैकी ९२३४ कामे पूर्ण झाली असून ५८६८ अपूर्ण आहेत. कामे पूर्ण होण्याचे प्रमाण ५७.३५ टक्के आहे.