मराठवाडा- विदर्भ सीमेवरील चेकपोस्टवर क्रुझरमधून १५ लाखांची रोकड जप्त
By रमेश वाबळे | Published: April 16, 2024 07:12 PM2024-04-16T19:12:06+5:302024-04-16T19:13:30+5:30
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, मुख्य मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवरील कनेरगाव नाका येथील चेकपोस्टवर वाहनांच्या तपासणीदरम्यान एका क्रुझरमध्ये १५ लाख रूपयांची रोकड आढळून आली. ही कारवाई १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास करण्यात आली. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केली असून, मुख्य मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची नाक्यावर कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील तपासणी नाक्यावर १५ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास एम.एच.३८- ३९१० क्रमांकाच्या क्रुझरमध्ये तपासणीदरम्यान १५ लाख रूपयांची रोकड आढळून आली.
अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता संबंधित व्यक्तीने समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच पुरावाही सादर करू शकले नाही. त्यामुळे पंचनामा करून एसएसटी पथकामार्फत रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, पथकाने दिलेल्या माहितीनुसार रोकडप्रकरणी आयकर विभागाला कळविण्यात आले असून, संबंधित व्यक्तीने १९ एप्रिल रोजी नांदेड येथील आयकर विभाग कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त केलेली १५ लाखांची रोकड कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली. ही कारवाई एसएसटी पथक प्रमुख विनायक देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, सुधाकर जाधव, भारत डाखोरे, बाळासाहेब इंगोले, विनोद शिंदे यांच्या पथकाने केली.