हिंगोली जिल्ह्यातील १५६ विविध सेवा सहकारी संस्थांचे होणार संगणकीकरण
By रमेश वाबळे | Published: October 19, 2023 06:55 PM2023-10-19T18:55:22+5:302023-10-19T18:56:06+5:30
हिंगोली जिल्ह्यात ४१३ नोंदणीकृत संस्था, संगणकीकरणामुळे कामाला येणार गती
हिंगोली : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४१३ पैकी १५६ विविध सहकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण होणार असून, त्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत ह्या संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे संगणकीकरण झाले आहे. परंतु, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा कारभार मात्र अजूनही कागदोपत्रीच सुरू आहे. शासनाच्या वतीने या संस्थांचेही आता संगणकीकरण होणार असून, त्यासाठी पावले उचलली जात आहेत. जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची संख्या ४१३ एवढी आहे. परंतु, यातील बहुतांश संस्थांची परिस्थिती बिकट आहे. बहुतांश संस्था कर्ज वितरणानंतर वसुली न झाल्यामुळे डबघाईत आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणच्या या संस्था केवळ नावालाच उरल्याचे चित्र आहे.
या संस्थांची स्थिती सुधारावी, कारभार पारदर्शक व्हावा याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून, हिंगोली जिल्ह्यातंर्गत ४१३ पैकी १५६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संगणकीकरणासाठी निवडण्यात आल्या आहेत. संगणकीकरणासाठी आवश्यक असलेले साॅफ्टवेअर, संगणक तसेच इतर साहित्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या मार्चपर्यंत निवडण्यात आलेल्या १५६ संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.