सीबीएसईचे १६४ विद्यार्थी परीक्षा न देता पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:00+5:302021-04-20T04:31:00+5:30
हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...
हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील १६४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यासह देशभरात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत चालला आहे. या संसर्ग आजाराची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून राज्य शिक्षण विभागाने पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला, तर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सीबीएसईच्या चार ते पाच शाळा आहेत. यातील चार शाळांमधील विद्यार्थी सीबीएसईच्या परीक्षेला बसले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील १६४ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मात्र, या निर्णयानंतर पालक, शिक्षण तज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील प्रवेश कोणत्या आधारावर घेतले जाणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.
सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी
मुले - ९५
मुली - ६९
पालक काय म्हणतात...
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर एखादा महिना उशिराही सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेता आली असती. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता समजण्यास मदत होते. पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे हे गुणवत्तेवरून ठरविता येते. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे क्षेत्र निवडण्यात चूक होऊ शकते.
- श्रीराम जाधव, पालक
कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घ्यायला हरकत नव्हती. हुशार विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे.
-सूर्यकांत खाडे, पालक
प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती परीक्षेवरून समजते. परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे साधन असल्याने परीक्षा ही घ्यायलाच पाहिजे. किमान दहावी, बारावीची तरी परीक्षा ही घ्यायलाच हवी.
-शिवाजी पवार, शिक्षण तज्ज्ञ
११वी, आयटीआय आदी प्रवेश कसे होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढील प्रवेश कसे होणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील प्रवेश कसे होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
गुणदान समपातळीवर कसे आणणार ?
शाळा स्तरावरील प्रात्यक्षिक गुणांचे गुणदान करता येणार असले तरी लेखी परीक्षेच्या ८० गुणांचे गुणदान कसे करायचे, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना शाळांना आल्या नसल्याचे शाळांतून सांगण्यात आले. त्यामुळे गुणदान करताना शाळांना मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे.