१७ गुन्हे दाखल आरोपीचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न; एमपीडीए अंतर्गत दाखवला कारागृहाचा रस्ता
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 25, 2023 06:19 PM2023-10-25T18:19:48+5:302023-10-25T20:11:37+5:30
पोलिस अधीक्षकांनी पाठविला होता प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
हिंगोली : नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे दाखल असलेल्या एकावर एम.पी.डी.ए.अंतर्गंत कारवाई करण्यात असून त्यास एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता.
अनिकेत बालाजी सुर्यवंशी (रा. दत्तनगर, नवा मोंढा, नांदेड) असे एम.पी.डी.ए. अंतर्गंत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचेवर हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर व नांदेड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. वजिराबाद (नांदेड) पोलिसांनी त्याचेविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. तरीही तो सतत गुन्हे करीत होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे तो समाजासाठी धोकादायक बनला होता. या प्रकरणी त्याचेविरूद्ध एम.पी.डी.ए अंतर्गंत कार्यवाही करावी, असा प्रस्ताव आखाडा बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता. जी. श्रीधर यांनी प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हाधिकारी पापळकर यांनी अनिकेत सुर्यवंशी याचेविरूद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करीत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास परभणी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरोडा टाकण्याचा केला होता प्रयत्न
अनिकेत सुर्यवंशी याने काही दिवसांपूर्वी आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत महामार्गावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यास हिंगोली पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते. आरोपीचे रेकॉर्ड तपासले असता नांदेड शहरात व जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, पिस्टल बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
वर्षभरात ३० जणांवर कारवाई
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गतवर्षी २६ ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारला होता. त्यांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाईची कडक भूमिका घेतली. समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या तब्बल ३० जणांवर एमपीडीए अंतर्गंत कार्यवाही करण्यात आली.