दलित वस्ती सुधार योजनेच्या १७.९५ कोटींचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:35+5:302021-05-21T04:30:35+5:30
याबाबत समाजकल्याण सभापती फकिरा मुंडे म्हणाले, मागील काही दिवसापासून या कामासाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी, सदस्यांकडून पडताळणी व इतर बाबींचे ...
याबाबत समाजकल्याण सभापती फकिरा मुंडे म्हणाले, मागील काही दिवसापासून या कामासाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी, सदस्यांकडून पडताळणी व इतर बाबींचे काम सुरू होते. त्यानंतर ही कामे निश्चित करून प्रशासकीय मान्यतेसाठी सर्व गावांचे तालुकानिहाय एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात थोडा काळ गेला. मात्र सदस्यांची नाराजी राहणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.
यंदा घेण्यात आलेल्या कामांमध्ये पाणीपुरवठा, सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक, नाली बांधकाम या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ठिकाणच्या विद्युतीकरणाच्या कामांना फाटा देऊन काही ठिकाणचे गरजेचे काम तेवढे आराखड्यात घेतले आहे. त्यामुळे यंदा विद्युतीकरणावरून होणारे आरोप टाळण्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली असल्याचे दिसत आहे. मागच्या दिवाळीपासून दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे नियोजन करण्यासाठी समितीचे प्रयत्न सुरू होते. तसा ठरावही घेण्यात आला होता. मात्र आधी ३३ टक्के निधीच खर्चाची मुभा होती. त्यानंतर तो वाढून ७० टक्के येणार असल्याचे सांगितले जात असल्याने तोपर्यंत नियोजन थांबविण्यात आले होते. तर नंतर १०० टक्केच निधी मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने पुन्हा अर्धवट नियोजन करण्यापेक्षा प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नंतर मार्च एण्डच आला. त्यामुळे मार्च एण्डला या कामांचे नियोजन करण्याची सर्व तयारी झाली तर सदस्यांनी पंचायत समितीकडून आलेल्या प्रस्तावातील कामांच्या निवडीसाठी विलंब केला. त्यामुळे अखेर मे महिना या निधीच्या नियोजनासाठी उजाडला असल्याचे दिसत आहे. यात ४८९ कामांना १७.९५ कोटी रुपये दिले आहेत. एकूण १९.३४ कोटींचे नियोजन होणार आहे. उर्वरित निधी बृहत आराखड्यानुसार काही गावांना टाकणे आवश्यक असल्याने तेथे दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
निधीचे पंचायत समित्यांना वितरण
या योजनेतील प्रशासकीय मान्यतेच्या सोबतच निधीच्या वितरणाचे आदेशही काढण्यात आले होते. त्यामुळे हा निधी आता पंचायत समित्यांना वर्ग झाला आहे. यामुळे ही कामे लागलीच सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींना संधी प्राप्त झाली आहे. इतर बाबींचे नियोजन केले तर आगामी काळात ही कामे काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य आहे.
तालुकानिहाय कामे व निधी वाटप
तालुका कामे निधी
हिंगोली १४० ५.०२
कळमनुरी ८० २.९४
वसमत १०० ४.५२
औंढा ८५ २.८९
सेनगाव ८४ २.५६
निधीचे आकडे कोटीत