५१ फुटी रावण पुतळ्याचे आज दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:15 AM2019-10-08T00:15:06+5:302019-10-08T00:23:25+5:30
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ८ आॅक्टोबर रोजी रात्री ११.१५ वाजता रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात ८ आॅक्टोबर रोजी रात्री ११.१५ वाजता रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी प्रमाणेच येथील रावण दहनाचे नियोजन सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. मंगळवारी भव्य आतषबाजीत रावण दहनाचा कार्यक्रम पार पडेल. तसेच ९ आॅक्टोबर रोजी रामलीलेतून भरत भेटीची नाटिका सादर केली जाणार आहे. तसेच रामलीला मैदाने येथून भजनाच्या गजरात मिरवणूक निघेल.
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची मागील १६५ वर्षांपासूनची परंपरा आहे. दसरा सणानिमित्त येथे राज्य-पराज्यातून येणाऱ्यांची गर्दी होते. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने विविध क्रीडास्पर्धा व धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. विशेष म्हणजे रामलीला पाहण्यासाठी याठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. दसरा प्रदर्शनात विविध प्रकारची दुकाने थाटली असून बच्चेकंपनीचे आवडते आकाश पाळण्यांवर सायंकाळी मोठी गर्दी दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून प्रदर्शन सुरू आहे. परंतु गतवर्षीसारखी यंदा तुरळक गर्दी असल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातून येणारे लोंढेही यावर्षी दिसले नाहीत. परंतु मागील दोन दिवसांपासून गर्दी वाढत आहे. हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवातील विविध कार्यक्रम थाटात पार पडत आहेत. कुस्त्यांची दंगल व विविध क्रीडा स्पर्धांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. आता ८ आॅक्टोबर रोजी लाखोंच्या साक्षीने रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. यावेळी आकर्षक आतषबाजी केली जाते. दसरा महोत्सवात मोठी गर्दी असते, त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून दखल घेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेºयात सर्वांच्या हालचाली कैद होणार आहेत. त्यामुळे एखाद्या संशयास्पद व्यक्तीबद्दल किंवा वस्तूविषयी कोणाला माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे. तर दसरा महोत्सवात ८ पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी तर १०० होमगार्ड तैनात असतील, असे पोनि अशोक घोरबांड यांनी सांगितले.
रावण दहन कार्यक्रमास जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. सार्वजनिक दसरा महोत्सवात रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन खाकीबाबा मठातील महंत कौशल्यदास महाराज, दसरा समितीचे अॅड. बापूराव बांगर व समतीच्या सर्व पदाधिकाºयांनी केले आहे. शिवाय समितीच्या वतीने रावण दहनाची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.