हिंगोली शहरात २० हजार वृक्षलागवड केली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:55+5:302021-06-04T04:22:55+5:30
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार नगर परिषद स्तरावरुन शहरामध्ये वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ५ जून ...
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार नगर परिषद स्तरावरुन शहरामध्ये वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ५ जून रोजी सकाळी ८ वाजता औंढा रोडवरील नवीन नाट्यगृहाच्या पाठीमागील जागेमध्ये वृक्षलागवड करुन प्रारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
‘घनवन लागवड’ अंतर्गत कयाधू नदीलगत मियावाकी पद्धतीने २ हजार वृक्ष, औंढा रोडलगत असलेल्या नवीन नाट्यगृहाच्या पाठीमागील जागेत १ हजार ८०० वृक्ष, ‘गाव तेथे देवराई’ अंतर्गत शहरातील धार्मिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये चिरागशहा दर्गा, जलेश्वर मंदिर,जलेश्वर तलाव परिसर, गोपालाल मंदिर परिसर येथे १ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ‘रस्ता दुतर्फा संकल्पनात्मक लागवड’ अंतर्गत नगर परिषद नवीन प्रशासकीय इमारत ते पोलीस अधीक्षक कार्यालय रस्ता, नवीन न्यायालय इमारत समोरील रस्ता, जि.प. समोरील रस्ता, बिरसामुंडा चौक ते पलटन पाणी टाकी, अकोला रस्ता आदी ठिकाणी १ हजार वृक्षलागवड, स्मृती वनअंतर्गत कयाधू नदी लगतच्या स्मशानभूमी, पाॅवर हाऊस रोडवरील स्मशानभूमी, रिसाला येथील स्मशानभूमी या ठिकाणी ५०० वृक्ष लागवड तसेच नदी, नाल्यांच्या काठावर वृक्षलागवड करण्याच्या दृष्टिकोनातून महादेववाडी परिसरात कयाधू नदीलगत १ हजार बांबू लागवड करण्यात येणार आहे.
दोनशे लोखंडी जाळ्यांचा सोडला संकल्प...
वृक्षारोपण केल्यानंतर लावलेली रोपे जनावरांना खाता येवू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांनी त्याचे जतन करण्यासाठी २०० लोखंडी जाळ्या देण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये नगर अभियंता आर.एस. अडसीरे, आर. व्ही. बांगर, श्याम माळवटकर, डी. बी.ठाकूर, जी. जी. हिरेमठ, किशोर काकडे, संदीप घुगे, अशोक गवळे, रवीराज दरक, विजय इटकापल्ले, प्रिया मोटे, सनोबर तसनीम, व्ही.एल. पुतळे, बी. डब्ल्यू. मगरे, कपील धुळे, विनय साहू, गजानन बांगर यांचा समावेश आहे, असे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आहे.