२१७ प्राथमिक शिक्षकांचे समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:58 PM2018-12-15T23:58:11+5:302018-12-15T23:58:28+5:30
प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती.
हिंगोली जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिकच्या शिक्षकांची संख्या २१८ एवढी आहे. या शिक्षकांना २३२ रिक्त जागांवर संधी होती. यासाठीची समुपदेशन प्रक्रिया जि.प.च्या सभागृहात घेतली. यासाठी अतिरिक्त मुकाअ पी.व्ही. बनसोडे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आदींची उपस्थिती होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही प्रक्रिया आटोपली नव्हती. अनेकांना यात गाव निवडण्याची संधी असली तरीही मनासारखे गाव सापडत नव्हते. विशेष म्हणजे महिलांना तर यात कोणते गाव घ्यावे, हेच समजत नसल्याने मोठी गोची होत असल्याचे चित्र होते. रिक्त पदांची संख्या सेनगाव तालुक्यात जास्त असल्याने शेवटच्या टप्प्यातील अनेकांना नाईलाजाने याच तालुक्यात जावे लागत होते. विशेष म्हणजे महिलांना यातील जवळचे व दूरचे गाव कोणते हे कळत नसल्याने ऐनवेळी फसगतच सोसावी लागली.
वसमतला अतिरिक्त शिक्षक ६७ तर रिक्त जागा २५, औंढ्यात अतिरिक्त शिक्षक ३६ तर रिक्त जागा ५९, कळमनुरीत अतिरिक्त शिक्षक ५१ तर रिक्त जागा ३८, सेनगावात अतिरिक्त शिक्षक २९ तर रिक्त जागा ७२, हिंगोलीत अतिरिक्त शिक्षक ३५ तर रिक्त जागा २९ होत्या.
माध्यमिकचे करून दाखवा!
ज्या पद्धतीने प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत आहे. तसा माध्यमिकसाठी ओढा का नाही. एकेका शाळेवर गणित, इंग्रजीचे दोन शिक्षक तर दुसरीकडे एकही नाही. त्यामुळे ग्रामीण शाळा बंद पडत असताना प्रशासन केवळ कागदी खेळ खेळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रियाही हाती घ्यावी. शिक्षण विभागाचा संचमान्यता मिळत नसल्याचा बनवाबनवीचा खेळ थांबवावा, अशी अपेक्षा काही जि.प. पदाधिकाºयांनी व्यक्त केली. आता भविष्यात हा मुद्दा काय रंग घेतो, हे कळणारच आहे.
शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीची घाई जि.प.प्रशासनाने केल्याने पदाधिकारी मात्र नाराज झाले. जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे हे सगळेच हजर असतानाही प्रक्रियेकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे अध्यक्षांनी या प्रक्रियेसंबंधित कागदपत्रांची मागणी करून ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी पत्र दिले होते. मात्र त्यालाही कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट सीईओच भ्रमणध्वनी बंद करून बसल्याचा आरोप केला जात होता. यामुळे या प्रक्रियेचे गाºहाणे घेवून येणाºयांना मजेशिररीत्या हे सगळे सांगितले जात होते. तर प्रक्रिया कायदेशीर झाली की नाही? याचाही अंदाज घेतला जात आहे.