पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:28 AM2018-05-16T01:28:14+5:302018-05-16T01:28:14+5:30
तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या उकाडा फार जाणवत असल्याने ग्रामस्थ नेहमीप्रमाणे उघड्यावर झोपले होते. दरम्यान, अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने समोर येईल त्याचा चावा घेत धूम ठोकली. गावात आराडा ओरडा झाला. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांना काहीही करता आले नाही. जखमींमध्ये लहान मुलांसह वयोवृद्धांचा समावेश आहे. भगवान गुठ्ठे, आनंदराव ठाकरे, शेख रसूल, उत्तम ठोंबरे, शुभम खडसे, अशोक घुगे, द्वारकाबाई गुठ्ठे, पंढरी गुठ्ठे, सुधाकर घुगे, सूरज गुठ्ठे, आंजनबाई ठाकरे, रंजनाबाई इंगोले यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार आहेत. तर काहीवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. कुत्र्याने अनेकांचे लचके तोडले आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्रे दिसले तरीही त्यांना ग्रामस्थ गावाबाहेर पिटाळून लावत आहेत.
हृदयविकाराने कृषी सहायकाचा मृत्यू
कळमनुरी : येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक नामदेव हरि बोथीकर यांना कार्यालयात कामकाज करीत असताना १४ मे रोजी दुपारी ३.१४ वाजता हृदयविकाराच्या झटका आला उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.कृषी सहाय्यक नामदेव हरी बोथीकर (४६) हे कार्यालयात कामकाज करीत बसले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आलाने त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. किशन बोथीकर यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद घेण्यात आली.