२२ हजार शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:57 PM2020-02-18T13:57:30+5:302020-02-18T13:58:58+5:30
१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेने हा इशारा दिला आहे.
हिंगोली : एचएससी फेब्रुवारी- मार्च २०२० बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ क.म.वि. शाळा कृती संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनात केला आहे.
राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर चालू असलेल्या जवळपास २२ हजार कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांना अजूनही नियमित वेतन मिळत नाही. अनुदानाचे भिजत घोंगडे कायम आहे. वेतन अनुदानाची तरतूद प्रत्यक्ष अर्थसंकल्प अधिवेशनात जाहीर होत नाही. त्यामुळे हक्काचा पगार खात्यावर जोपर्यंत जमा होणार नाही, तोपर्यंत १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेने संपूर्ण राज्यभर हा बहिष्कार टाकल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहणार असल्याचा इशारा प्रा. आशिष इंगळे, ज्ञानेश्वर सिरसाट आदींनी दिला आहे.
१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेने हा इशारा दिला आहे. राज्यात २२ हजार तर हिंगोलीत पाचशेवर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर हा पेच निर्माण होणार आहे.