सात वर्षांत केल्या २२०५ रोजगाराच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:42+5:302021-07-15T04:21:42+5:30
जागतिक युवा कौशल्य दिन : ४ हजार ४९४ घेतले प्रशिक्षण वर्ग हिंगोली : शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत ...
जागतिक युवा कौशल्य दिन : ४ हजार ४९४ घेतले प्रशिक्षण वर्ग
हिंगोली : शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सात वर्षात जिल्ह्यात २२०५ रोजगाराच्या नोंदी केल्या असून ४ हजार ४९४ प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. यानिमित्त १५ जुलै रोजी जिल्ह्यात कार्यक्रमही घेतले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने देण्यात आली.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सूचनेनुसार सात वर्षांत जिल्ह्यामध्ये २ हजार २०५ प्रशिक्षण घेण्यात आले. वेळोवेळी प्रशिक्षणात रोजगाराबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. २३ मार्च २०१९ पासून कोरोनाने सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे या काळात रोजगाराबाबत प्रशिक्षण घेण्यात आले नाही. परंतु, ज्यांनी कार्यालयात येऊन विचारणा केली, त्यांना रोजगाराबाबत वेळोवेळी योग्य दिशा देण्यात आलेली आहे. आजही कोरोना महामारीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता रोजगाराबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
१५ जुलै रोजी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आरोग्यविषयक अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांचे नियोजन करून हिंगोली शहरासाठी उर्मिला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ‘जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हान्स’ या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित गरजू बेरोजगारांना दुपारी एक वाजेच्या सुमारास ‘गूगल मीटद्वारे’ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत ‘रोजगाराची संधी व परिपूर्ण मार्गदर्शन’ या विषयावर समुपदेशन शिबिर घेण्यात येणार आहे.
या समुपदेशन शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया...
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शहर व जिल्ह्यात शासनाच्या सूचनेप्रमाणे ‘गूगल मीटद्वारे’ मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग नोंदवावा. यावेळी ‘हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा उद्योग योजना’ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
- प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त