चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या

By रमेश वाबळे | Published: December 9, 2023 07:05 PM2023-12-09T19:05:01+5:302023-12-09T19:05:50+5:30

मेंढपाळांचे दोन लाखांवर नुकसान झाले आहे

23 sheep died due to fodder poisoning, 17 sheep survived | चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या

चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या

शिरडशहापूर (जि.हिंगोली) : चाऱ्यातून विषबाधा होऊन ४० पैकी २३ मेंढ्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला शिवारात ९ डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. या मेंढ्या वसमत तालुक्यातील कोर्टा येथील मेंढपाळांच्या होत्या. त्यांचे दोन लाख रुपयांवर नुकसान झाले आहे.

वसमत तालुक्यातील कोर्टा येथील विष्णू भाऊराव आव्हाड २५ व नारायण सुभानराव आव्हाड यांच्या १५ मेंढ्या चारण्यासाठी औंढा तालुक्यातील शिरला शिवारात ८ डिसेंबरला आणल्या होत्या. या भागात दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर रात्री वाघीशिंगी शिवारात ते मुक्कामी थांबले होते. परंतु, विषबाधा झाल्यामुळे रात्री मेंढ्या तडफडत होत्या. हा प्रकार मेंढपाळांच्या लक्षात आला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने तातडीने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे ४० पैकी २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर १७ मेंढ्या बचावल्या.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मधुसूदन रत्नपारखे, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सखाराम खुणे, लातूरचे सहआयुक्त डाॅ. नानाअर्जुन सोनवणे, डाॅ. बोलपेलवार, डाॅ. खेडकर, डाॅ. खिल्लारे, डाॅ. पाटील, डाॅ. अंकुश राठोड, टाकळकर, डाॅ. पडोळे, डाॅ. धुळे, डाॅ. झनकवाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण पुढे येईल..
शेतात सध्या रब्बीची कोवळी पिके असून, अवकाळी पावसामुळे काढणीच्या वेळी पडलेले सोयाबीनही उगवले आहे. हे कोवळे पीक खाल्ल्यामुळे मेंढ्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण पुढे येईल.
- डाॅ. अंकुश राठोड, पशुधन वैद्यकीय अधिकारी, वाई गोरक्षनाथ

Web Title: 23 sheep died due to fodder poisoning, 17 sheep survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.