कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:29 AM2021-04-25T04:29:53+5:302021-04-25T04:29:53+5:30

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला ...

241 couples reunited due to 'trust cell' during Corona period | कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

Next

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र योग्य समूपदेशन केल्यास पुढील दुष्परीणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समूपदेशन केल्याने वर्षरात २४१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोना आजाराने कहर केला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला होता. सध्याही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून विवाहित जोडप्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यात संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारिरीक व मानसिक त्रास आदी कारणांची भर पडत आहे. वाद विकोपाला पोहचत असल्याने पाल्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. शेवटी अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. घटस्फोटानंतर याचे परिणाम जोडप्यासह लहान मुलांनाही भोगावे लागतात. त्यामुळे अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उभारलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. दोघामध्ये तडजोड घडवून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १६१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्याच्या काळात ८० जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश आले आहे. सध्या ही जोडपी आनंदाने नांदत असून त्यांच्यात कोणतेही वाद होत नसल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यात ८० जोडप्यांना एकत्र आणण्यात यश

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. भरोसा सेलकडे मागील तीन महिन्यात १७२ प्रकरणे समूपदेशनासाठी आली होती. त्यातील ८० प्रकरणात तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश पी.व्ही. खिल्लारे, स.पो.नि. विशाखा धुळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक खिल्लारे, वैद्यकीय सल्लागार डॉ. मेघा सुळे, समुपदेशक अमोल वायवळ, संरक्षण अधिकारी नितीन मकासरे, बालसमुपदेशक सचिन पठाडे, विधी सल्लागार मंगल भोजनकर, काजल हनमणे, पोलीस कर्मचारी शेख इस्माईल, सुनिता शिंदे, वर्षा शिंदे, स्वाती डोलारे, शिल्पा फटाले आदींनी पुढाकार घेतला आहे.

संचारबंदीमुळे समूपदेशनाचे काम थांबले

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू आहे. या काळात जोडप्यांना मुख्यालयी येण्यात येणाऱ्या अडचणी तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता समुपदेशनात अडथळा निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवस समूपदेशनासाठी जोडप्यांना तारखा दिल्या नाहीत.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. वर्षभरात २४१ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सपोनि. भरोसा सेल

फोटो : ६

Web Title: 241 couples reunited due to 'trust cell' during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.