व्हीजेएनटीच्या आश्रमशाळेतील २४३३ मुलांना मिळणार टॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:29 AM2021-08-29T04:29:11+5:302021-08-29T04:29:11+5:30

हिंगोली जिल्ह्यात समाज कल्याणकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमार्फत शिक्षण दिले जाते. ...

2433 children from VJNT's ashram school will get tabs | व्हीजेएनटीच्या आश्रमशाळेतील २४३३ मुलांना मिळणार टॅब

व्हीजेएनटीच्या आश्रमशाळेतील २४३३ मुलांना मिळणार टॅब

Next

हिंगोली जिल्ह्यात समाज कल्याणकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमार्फत शिक्षण दिले जाते. सध्या कोरोनाच्या काळात यातील अनेक बंद आहेत. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने टॅब उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील २० आश्रमशाळांतील २४३३ विद्यार्थ्यांना हे टॅब वाटप केले जाणार आहेत. या वर्गांमध्ये जवळपास एवढीच विद्यार्थीसंख्या असल्याचे समाजकल्याणकडून सांगण्यात आले. हे टॅब देताना निवासी मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळाही यामुळे हायटेक होणार असून या विद्यार्थ्यांनाही मूळ शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना टॅब मिळणार असल्याचे यापूर्वी ऐकायला मिळायचे. आता ही बाब प्रत्यक्षात उतरत असल्याचे पहायला मिळत आहे.

आधी प्रशिक्षण देणार

शासनाने हे टॅब उपलब्ध करून दिले असले तरीही त्यांच्या वापराचे ज्ञान या मुलांना असेलच असे नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात या शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली. तर हे टॅब शासनाच्या मालकीचे असल्याने त्यांची योग्य हाताळणी करावी. तर शालेय कामकाजासाठीच त्यांचा वापर करावा, शाळा सुरू असताना टॅब घरी नेल्यास सुरक्षिततेची हमी द्यावी. शाळा संपल्यावर ते व्यवस्थित शाळेत जमा करावेत, आदी सूचना दिल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.

शाळा स्तरावर समिती

मुलांची शाळा संपल्यावर शाळांमध्ये जमा होणाऱ्या टॅबच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होणार आहे. यासाठी शाळा स्तरावर एक समिती गठित केली जाणार आहे. या समितीवर या टॅबच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे. ही समितीच सुरक्षेसाठी जबाबदार राहणार आहे.

Web Title: 2433 children from VJNT's ashram school will get tabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.