२५ हजार मराठा बांधव ध्वजारोहणासाठी हिंगोलीत धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:51 AM2018-08-14T00:51:00+5:302018-08-14T00:51:05+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने येथील गांधी चौकात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चर्चेलाही बोलावले होते. सकारात्मक चर्चा झाली, पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. १५ आॅगस्टला २५ हजार मराठा समाजबांधव जिल्हा कचेरीवर धडकतील, असा विश्वास सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सकल मराठा समाजाच्या वतीने येथील गांधी चौकात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी चर्चेलाही बोलावले होते. सकारात्मक चर्चा झाली, पण फारसे काही निष्पन्न झाले नाही. १५ आॅगस्टला २५ हजार मराठा समाजबांधव जिल्हा कचेरीवर धडकतील, असा विश्वास सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
जिल्हाभरात गेल्या २० दिवसांपासून मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी विविध आंदोलने केली जात आहेत. गांधी चौकात १५ दिवसांपासून ठिय्या दिला आहे. लोकप्रतिनिधींना गावबंदी व पालकमंत्र्यांना १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण करू दिले जाणार नसल्यचा इशाराही निवेदनाद्वारे दिलेला आहे. यासाठी सर्व जिल्हा परिषद सर्कलनिहाय मराठा बांधव येण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. समन्वयकांना ही जबाबदारी दिली आहे. किमान २५ हजार समाजबांधव उपस्थित राहतील, असा विश्वास वर्तविण्यात आला. पालकमंत्र्यांशिवाय शासकीय अधिकारी, वीरपत्नी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांच्या हस्ते १५ आॅगस्टचे ध्वजारोहण व्हावे, अशी मागणी केली जात आहे.
वसमतला बाराव्या दिवशीही ठिय्या
वसमत : येथे २ आॅगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीवरून सूरू आसलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या बाराव्या दिवशीही आंदोलन सुरूच असून आज धनगर समाजाने ही आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासह सरकारचा निषेध केला.
सकाळपासून ठिय्या आंदोलनात असेगाव सर्कल मधील मालापूर, रूंज, गुंज, पळसगाव, टाकळगाव, सुनेगाव, दगडपिंप्री इ. गावांतील सकल मराठा समाजाने सक्रिय पुढाकार घेतला आहे. भजन, पोवाडे, सरकार निषेधार्थ रचलेली गाणे आणि आरक्षण आमच्या हक्काचे..., एक मराठा लाख मराठा.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... ! आदी घोषणांनी परिसरात सरकारचा निषेध केला.
मागील बारा दिवसांत येथे विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली.
प्रत्येक दिवशी नवे आंदोलन करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र अजूनही मागण्यांवर कोणताच निर्णय नसल्याचे दिसून येत आहे.
शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
जिल्हाधिकाºयांकडे शिष्टमंडळाने विविध ७ मागण्या मांडल्या. तर त्या पूर्ण न झाल्यास शहिदाची वीरपत्नी, प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांना ती संधी द्यावी अन्यथा पालकमंत्र्यास ध्वजारोहण करण्यास आम्ही मज्जाव करू, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, तुम्ही प्रशासनाकडे सादर केलेल्या मागण्या आम्ही पालकमंत्री व शासनाकडे पाठविल्या असून याबाबत सकारात्मक निर्णय होईल. आपल्या मागण्यांबाबत योग्य ते पाऊल उचलले जाईल, असे आश्वासित केले. या बैठकीला अ. जिल्हाधिकारी जगदीश मनियार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्यासह मराठा समन्वयक उपस्थित होते.