मग्रारोहयोत २६.३७ लाखांचा घोटाळा; तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 03:24 PM2022-06-15T15:24:55+5:302022-06-15T15:25:06+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील आठ गावांमध्ये मग्रारोहयो योजनेत गावाची मागणी नसताना गॅबियन बंधारे करून २६.३७ लाखांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडीस आले आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील आठ गावांमध्ये मग्रारोहयो योजनेत गावाची मागणी नसताना गॅबियन बंधारे करून २६.३७ लाखांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर औंढा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील हे घोटाळा प्रकरण लोकमतने उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणात चौकशी समिती नेमली होती.
कामे न करताच बनावट मजुरांच्या नावाने रक्कम हडपण्याचा प्रकार केला जात असल्याचे समोर आले होते. यात चौकशी समितीने बऱ्याच विलंबानंतर अहवाल सादर केला आहे. यावरून आधी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून इतरांवरील कारवाई प्रस्तावित केलेली आहे. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी सखाराम बेले यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी १५ जून रोजी पहाटे २ च्या सुमारास औंढा ठाण्यात तक्रार दिली.
यात म्हटले की, २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात ते आतापर्यंत तालुक्यातील आठ गावांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून शासनाच्या योजनेतील पैशांचा गैरउपयोग केला. ग्रामपंचायतींकडून मान्यतेचा प्रस्ताव न घेता गॅबियन बंधऱ्यांच्या कामांना परस्पर मान्यता देवून ही कामे सुरू केली. एवढेच नव्हे, तर मजुरांचे बनावट खाते उघडून शासनाच्या २६ लाख ३७ हजार ९९० रुपयांच्या रक्कमेचा गैरव्यवहार केल्याचे समितीच्या अहवालावरून निष्पन्न झाले. यावरून तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जे.एम. साहू, सहायक लेखा अधिकारी एल.के. कुरुडे, सेवानिवृत्त शाखा अभियंता सय्यद सलीम सय्यद दगडू, कंत्राटी कर्मचारी तथा सहायक कार्यक्रम अधिकारी गजानन कल्याणकर, तांत्रिक अधिकारी राहुल सूर्यवंशी, सुयोग जावळे, ऑपरेटर देवराव कंठाळे, विनोद गायकवाड, विनोद घोडके या ९ जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.