काळ्या बाजारात जाणारा २७ टन रेशनचा तांदूळ पकडला
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: July 1, 2023 09:11 PM2023-07-01T21:11:56+5:302023-07-01T21:13:25+5:30
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी : ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रमुनी बलखंडे
हिंगोली : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात २७ टन रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला. ही कारवाई हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात १ जून रोजी पहाटे १:४५ वाजता केली. यात पोलिसांनी २७ टन रेशनच्या तांदळासह ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला एका ट्रकमधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलिस अंमलदार तुकाराम आम्ले, मोसिन पठाण, सुमित टाले, विनोद दळवी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे,आजम प्यारेवाले यांच्या पथकाने रिसाला बाजार येथे सापळा लावला. यावेळी अकोला बायपास भागाकडून नांदेड नाकाकडे एक ट्रक येत असल्याचे पथकाला दिसले. त्यांनी ट्रक थांबवून आतमध्ये पाहणी केलीअसता त्यात रेशनचा तांदूळ आढळून आला. चालकास या बाबत विचारणा केली असता अकोला बायपास भागातून ट्रकमध्ये माल भरला. हा माल कोठे घेऊन जायचा ते रौफभाई नावाचा व्यक्ती सांगणार होता, असे त्याने सांगितले. पोलिसांनी ५ लाख ४० हजार रूपये किमतीचा अंदाजे २७० क्विंटल असा २७ टन तांदूळ तसेच २५ लाख रूपये किमतीचा ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या फिर्यादीवरून चालक सुर्यकांत नागनाथ आप्पा स्वामी (रा. तुळशीरामनगर तरोडा नाका नांदेड) व हिंगोलीतील रौफभाई नावाच्या व्यक्तीवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत.
तपासानंतर मुख्य सुत्रधार येणार समोर
रेशन धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासन रेशन धान्य वितरण प्रणालीत दिवसेंदिवस सुधारणा करीत आहे. ऑनलाईन प्रणालीही राबविली जात आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.