२८ लाखांची खंडणी मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:02 AM2019-01-07T00:02:37+5:302019-01-07T00:02:55+5:30
वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरूंदा शिवारातील टोकाई कारखाना येथे कैलास राठोड, त्यांची पत्नी हे किराणा दुकान टाकून उदरनिर्वाह करतात. फिर्यादी हा पळसोना ता.हिंगोली येथील रहिवाशी आहे. फिर्यादीच्या पत्नीने १० वर्षापूर्वी २० बैलबंडी ऊस तोडीकरिता लावून देण्यासाठी ५ लाख रुपये घेतले होते. त्यावेळेस ठरल्याप्रमाणे २० बैलबंडी लावून देण्यात आले. या घटनेतून तब्बल १० वर्षानंतर आरोपी दिलीप उघडे व इतर चार जणांनी संगनमत करून क्रूझर जीपमध्ये टोकाई कारखाना येथून फिर्यादीचा पती कैलास राठोड यास उचलून नेऊन त्याचे अपहरण केले. ही घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली होती. फिर्यादीने त्यावेळेस अर्ज दिला होता. परंतु मोबाईलवरून फिर्यादीस तुझा पती पाहिजे असेल तर २८ लाख रुपये आणून दे, अन्यथा तुझ्या पतीला जिवे मारतो, अशी धमकी दिली होती. फिर्यादीच्या पतीला डांबून खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे.
फिर्यादी शीलाबाई कैलास राठोड (४२, रा.पळसोना ता.जि.हिंगोली ह.मु. टोकाई कारखाना) यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप हरिभाऊ उघडे (रा. बोडखा ता.धारूर जि.बीड) व इतर चार जण एकूण पाच जणाविरोधात कलम ३६१ अ, ५०६,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि शंकर वाघमोडे, जमादार बी.टी.केंद्रे, पोना आडे हे करीत आहेत.
अपहरण झालेल्या इसमाचा अद्याप शोध लागला नसून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत.
अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी धारूरला पोलीस पथक जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र येथील परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
वसमत येथे तरूणाची आत्महत्या
वसमत : येथील आंबेडकर नगर भागातील रहिवाशी २८ वर्षीय युवकाने राहत्या घरात शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी वसमत शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसमत शहरातील आंबेडकर नगर येथील सिद्धार्थ (पिंटू) जळबाजी दातार (२८) या तरूणाने ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर वेळ निश्चित नाही, साडीने घरातच गळफास घेतला. सदर तरूण घरात एकटाच राहत असे. दुपारी त्याचा जेवणाचा डबा घेवून आलेल्या भाच्यास हा प्रकार समजला. याप्रकरणी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परंतु आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.