व्यापाऱ्याला ३ कोटी ३५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 06:10 PM2020-10-08T18:10:20+5:302020-10-08T18:10:56+5:30
येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ३ कोटी ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली : येथील एका व्यापाऱ्याला तब्बल ३ कोटी ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली शहरातील नाईकनगर येथील ज्ञानेश्वर बालकृष्ण मामडे यांची शहरालगतच्या लिंबाळा मक्ता एमआयडीसी परिसरात शिवा पार्वती पोल्ट्री फिडस् कंपनी आहे. पुणे येथील साकार कंपनीचे संचालक मंगेश केशव धुमाळ व शितल धुमाळ यांनी संगनमत करून मामडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २९ मार्च २०१७ ते १४ जुलै २०१७ या कालावधीत फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धुमाळ यांनी पाठवलेल्या ऑर्डरनुसार मामडे यांनी ३ कोटी ३५ लाख १७ हजार ९०९ किंमतीचे १२३३.३३० मे. टन सोयाबीन डीओसी (ढेप) त्यांना पाठविली.
परंतु आरोपींनी पर्चेस ऑर्डरनुसार अटीप्रमाणे रक्कम दिली नाही. रक्कम द्यावी म्हणून मामडे यांनी वारंवार पाठपुरावा केला. परंतु आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मामडे यांनी याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. त्यावरून विश्वासघात करून फिर्यादी मामडे यांची ३ कोटी ३५ लाख १७ हजार ९०९ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंगेश धुमाळ व शितल धुमाळ या दोघांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.