रेशन दुकानासाठी ३० हजारांची लाच; महसूल सहायक व शिपायावर एसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:18 PM2021-12-04T13:18:05+5:302021-12-04T13:20:01+5:30
ACB raid in Hingoli : निलंबित केलेले दुकान चालू करण्यासाठी तसेच परवाना नूतनीकरणासाठी मागितली लाच
हिंगोली : निलंबित केलेले रेशन दुकान चालू करण्यासाठी व परवाना नूतनीकरणासाठी शिपायामार्फत ३० हजारांची लाख स्वीकारताना पुरवठा विभागातील महसूल सहायकास पकडले(ACB action against Revenue Assistant and Peon). ही कारवाई हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. ३ डिसेंबर रोजी केली.
निलंबित केलेले दुकान चालू करण्यासाठी तसेच परवाना नूतनीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागातील महसूल सहायक शंभुनाथ संतराम दुभळकर याने एका ५५ वर्षीय रेशन दुकानदार महिलेकडे ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने रेशन दुकानदार महिलेने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केली. यावेळी ३० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या पथकाने ३ डिसेंबर रोजी सापळा लावला. यावेळी शंभुनाथ दुभळकर याने लाचेची ३० हजारांची रक्कम शिपाई जमुनाबाई रायाजी इसाये हिच्याकडे देण्यास सांगितले. तसेच ही रक्कम इसाये यांच्यामार्फत स्वीकारली.
याप्रकरणी पथकाने महसूल सहायक शंभुनाथ दुभळकर (रा. अंबरवाडी, ता. जिंतूर) व शिपाई जमुनाबाई इसाये (रा. दाताडा खुर्द, ता. सेनगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीलेश सुरडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक म. युनूस, पोलीस हवालदार विजय उपरे, विजय शुक्ला, पोलीस शिपाई रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, अविनाश कीर्तनकार, योगीता अवचार, राजाराम फुफाटे, हिम्मतराव सरनाईक यांच्या पथकाने केली.