मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:54 AM2018-02-16T00:54:33+5:302018-02-16T00:54:37+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या २१२ ग्रामपंचायतींमध्ये ८८१ कामे सुरू असल्याचे मग्रारोहयोतून सांगण्यात आले. यामध्ये औंढा तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींत २७९, वसमत तालुक्यात २४ ग्रा.पं.त ९४, हिंगोली तालुक्यात ४० ग्रा.पं.त १७२, कळमनुरी तालुक्यात ६१ ग्रा.पं.त २३३, सेनगाव तालुक्यात २८ ग्रा.पं.त १०३ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कामांवर औंढा-३८३८, वसमत-९८८, हिंगोली-२२२२, कळमनुरी-२५९६, सेनगाव-१२६६ अशी तालुकानिहाय मजूर उपस्थिती आहे. सुरू असलेल्या या कामांमध्ये बहुतांश कामे ही विहिरींची असल्याचे सांगण्यात येते. काही पंचायत समित्यांमध्ये नवीन कामे सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात असली तरीही केवळ विहिरींच्या कामांमुळेच मजूरसंख्येत भर पडली आहे.
या योजनेविषयी वाढत्या तक्रारींमुळे कामे होत नसून काही ठिकाणी तर नाहक तक्रारी करणाºयांचे टोळकेच निर्माण झाल्याचे दिसते. अशांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आल्यावर प्रशासनानेही त्यांचे मनोरंजन न केल्यास त्याला चाप बसू शकतो. शिवाय लोकप्रतिनिधींनीही नुसती कामे सुरू होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास ही वेळच येणार नाही.
मग्रारोहयोत झालेल्या कामांची कुशलची रक्कम मात्र मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब सुरू आहे. यात ३.०७ कोटी रुपये थकले आहेत. यात औंढा-६६.७ लाख, वसमत-१८.०६ लाख, हिंगोली-३८.९८ लाख, कळमनुरी-९६.२७ लाख, सेनगाव-८७.३९ लाख अशी तालुकानिहाय रक्कम आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांची मिळून ५४ लाखांची मजुरी मिळणे बाकी असून ३६ लाख कळमनुरीचे आहेत.