हिंगोलीत ‘सौभाग्य’साठी ३२ हजार वीज मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:49 AM2018-10-05T00:49:04+5:302018-10-05T00:50:26+5:30
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल्हयातील ४७ हजार २३१ कुटुंबाना वीज जोडणी देण्याचे उदिष्ट महावितरणला आहे.
महावितरणने २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील अद्याप वीज नसलेल्या ४७ हजार २३१ कुटूंबांना सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज जोडणीचे लक्ष निधार्रीत केले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या निर्देशानुसार ‘सौभाग्य’च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटूंबांना वीजेचे स्वप्न साकार करण्याच्या हेतूने सर्व वीज जोडणीकरीता जुलै २०१८ पासून मोहीमेस प्रारंभ केला आहे.
जिल्ह्यातील ४७ हजार २३१ कुटूंबियांपैकी ४ हजार ३२५ कुटूंबियांकरीता नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यात रोहित्रासह विजेचे खांब, तारा कामांचा समावेश आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांमध्ये सर्व यंत्रणा उभी करण्याचे आदेश संबंधीत एजन्सीधारकांना दिले आहेत. विजेपासून वंचीत असलेल्या २३ हजार ९०८ कुटूंबियांना सौभाग्यच्या माध्यमातून पंधरा दिवसाच्या आत वीजजोडणी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
योजनेतंर्गत (दारिर्द्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलइडी बल्ब आणि एक पिनपॉर्इंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीजजोडणीपासून वंचित इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) यांना अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांत भरण्याची सुविधाही असल्याचे सांगण्यात आले.
पंधरा दिवसांत कामे : उद्दीष्ट पूर्ततेचे नियोजन
सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरीबाच्या घरात वीजजोडणी मिळणार आहे. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे सर्व सामान्य कुटूंबांचे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ होणार आहे. योजनेची कामे जोरात सुरू असून कर्मचारी दररोज दोन हजार वीज जोडण्या पूर्ण करीत आहेत. उदिष्ट पुर्तता येत्या पंधरा दिवसांत पूर्ण केली जाईल, तसे नियोजन करण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. वीजजोडणी करीता आवश्यक वीज मीटरही उपलब्ध आहेत. सध्या योजनेसाठी हिंगोली मंडळाकडे ३२ हजार मीटर उपलब्ध असून येत्या दोन दिवसांत आणखी १० हजार मीटर उपलब्ध होणार असल्याचेही जाधव म्हणाले.