हिंगोलीत ३३ लाखांचा धान्य घोटाळा; तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांवर गुन्हा दाखल
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 29, 2023 11:35 AM2023-03-29T11:35:36+5:302023-03-29T11:36:58+5:30
हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप झाल्याचे समोर आले होते.
हिंगोली : जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ऑफलाईन धान्य वाटप व अतिरिक्त धान्य वाटपामध्ये अनियमितता झाल्याचे उघड झाले होते.यातील ३३ लाख रूपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या हिंगोली तहसीलच्या तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नांद झाला.
हिंगोली तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीत ऑफलाईन धान्य वाटप करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्ति धान्याचे वाटप झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुरवठा विभागाने नोटीस देऊन अतिरिक्त वाटप झालेल्या धान्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही जणांनी धान्याची रक्कम भरणा केली.मात्र, यामध्ये ३३ लाख रुपयांची वसुलपात्र रक्कम भरण्यात आली नव्हती. याप्रकरणी बुधवारी पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात २० जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.
तत्कालीन तहसीलदारांसह २० जणांचा समावेश
जानेवारी ते जुलै २०१९ या काळात ऑफलाईन धान्य वाटप व अतिरिक्त धान्य वाटपामध्ये अनियमितता करून फसवणूक केल्याप्रकरणी हिंगोली तहसीलचे परिविक्षाधिन तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे, तत्कालीन अव्वल कारकून कैलास वाघमारे, तत्कालीन गोदामपाल इम्रान पठाण, तत्कालीन अव्वल कारकून बी.बी. खडसे, रास्तभाव दुकानदार रेखा प्रकाश पाईकराव (माळसेलू), पी.आर. गरड (राहोली), ज्ञानेश्वर रामराव मस्के (सिरसम बु.), विनोद लक्ष्मण आडे (पेडगाव १), हिंगोली तालुका विक्री संघ क्र. १ चे चालक, रास्तभाव दुकानदार एस.के. चव्हाण (पळसोना), डी.एम. शिंदे (सावरगाव बं), मिलिंद निवृत्ती पडघन (जुमडा म.), गणाजी मुकिंदा बेले (खेर्डावाडी), अनुसया अंबादास गाडे (वैजापूर), गोपाल तापडीया (भिरडा), डी.बी. चव्हाण (हिरडी), डी.बी. चव्हाण (मौजा), गजानन नामदेव गडदे (गाडीबोरी), गोविंदा पुंजाजी मस्के (तिखाडी), पतिंगराव मस्के (वराडी) याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत.