३,४८,०६९ बालकांना दिली जाणार जंतनाशक गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:32 AM2021-09-21T04:32:35+5:302021-09-21T04:32:35+5:30
हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २१ सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन ...
हिंगोली : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २१ सप्टेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील ३ लाख ४८ हजार ६९ बालकांना जंतनाशकाची गोळी दिली जाणार आहे. तसेच २८ सप्टेंबर रोजी माँपअप दिन राबविण्यात येणार आहे.
१ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांत मातीमधून आतड्याचा कृमीदोष प्रसारित होतो. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे. यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. हा अजार होऊ नये यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील लाभार्थींना जंतनाशकाची गोळी देऊन त्यांचे आरोग्य निरोगी व सदृढ ठेवणे, लाभार्थांची पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत आहे. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार ६९ बालकांना जंतनाशकाची गोळी दिली जणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २,६१,०९६ तर शहरी भागातील ८६,९७३ असे एकूण ३,४८,०६९ लाभार्थांचा समावेश आहे. शाळेतील ६ ते १९ वर्षे वयोगटातील २४९६३२, शाळाबाह्य ७५७२, अंगणवाडीतील १ ते २ वर्षाचे २३,०११ तर २ ते ५ वर्षाचे ६७,८५४ बालक असे एकूण ९०,८६५ लाभार्थी असणार आहेत. या मोहिमेतून राहिलेल्या लाभार्थांना माँपअप दिनी २८ सप्टेंबर रोजी जंतनाशकगोळी दिली जाणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्था, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
अशी द्यावी गोळी
जंतनाशक गोळीचा डोस वयोगटानुसार देण्यात येणार आहे. यात १ ते २ वर्षे अर्धी गोळी (२०० मिलीग्रॅम) व २ ते ३ वर्ष वयोगटांतील लाभार्थींना पूर्ण एक गोळी (४०० मिलीग्रॅम) पाण्यात विरघळून देण्यात देण्यात येणार आहे. तसेच ३ ते १९ वयोगटातील लाभार्थांना एक गोळी (४०० मिलीग्रॅम) चघळून खाऊ घालावी. शाळाबाह्य मुलांना अंगणवाडी केंद्रात गोळ्या देण्यात येणार आहेत.
गोळी खाऊ घालण्यापूर्वी अशी घ्या काळजी
-आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे. रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
-आजारी बालकांना गोळी देऊ नये.
- गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीमध्ये निरीक्षणासाठी थांबवून ठेवावे.
- गोळी खाल्ल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजीवनी पाजणे, त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे.
- ज्या मुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे, त्या मुलांना गोळी खाल्ल्यानंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही, अशी माहिती
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.