औंढा नागनाथ येथे गहू व तांदळाचा ३७० क्विंटल अवैधसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 06:13 PM2022-01-14T18:13:38+5:302022-01-14T18:14:02+5:30
पोलिसांनी जप्त केलेला साठ्यातील नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला आहे.
औंढा नागनाथ ( हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य एका ठिकाणी अवैधरीत्या साठवून ठेवलेला ३७० क्विंटल गहू व तांदळाचा साठा पोलिस प्रशासनाने कारवाई करून जप्त केला. ही कारवाई आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. हा साठा स्वस्तधान्य दुकानातील असल्याचा संशय आहे. दोन्ही ठिकाणी महसूल व पोलिसांनी पंचनामा केला आहे.
बाजार समितीमध्ये गाळा क्रमांक 11 मधील बालाजी ट्रेडिंग कंपनी आणि अन्य एका ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदळाचा अवैधरीत्यासाठा करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना मिळाली. यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती व सौदागर कॉम्प्लेक्स येथील एका दुकानात छापा मारला. येथे महाराष्ट्र शासन खाद्य पुरवठा असे छापलेली पोती आढळून आली. यामुळे हा साठा स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशय आहे. बाजार समितीमधील गोदामात ३०० क्विंटल गहू तर सौदागर कॉम्प्लेक्समध्ये ४० क्विंटल गहू व ३० क्विंटल तांदूळ असा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी जप्त केलेला साठ्यातील नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवशंभ घेवारे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलीस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, पुरवठा अधिकारी वैजनाथ भालेराव, जमादार संदीप टाक, गजानन गिरी, ओमकार राजनेकर ,गणेश गायकवाड ,अमोल चव्हाण यांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.