‘त्या’ ट्रकमध्ये जनावरांची ३९.६ टन कातडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:27 AM2018-09-03T01:27:57+5:302018-09-03T01:28:12+5:30
शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास मुख्य महामार्गावर पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळून आला होता. हा ट्रक शनिवारी त्याब्यात घेऊन ठाण्यात उभा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास मुख्य महामार्गावर पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळून आला होता. हा ट्रक शनिवारी त्याब्यात घेऊन ठाण्यात उभा केला. ट्रकमध्ये जनावरांचीच चामडी आहे का? हे पाहण्यासाठी पोलिसांनी ट्रकमधील एक तुकडा तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी ही कातडी जनावरांची असल्याचे निष्पन्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकमधून ३९.६ टन विविध जनावरांची कातडीची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील हायवेवर १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करताना पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने नेमकी ट्रकमधून कशाची वाहतूक केली जात आहे, याची कसून चौकशी करण्यात आली. ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. जनावरांची कातडी असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे यातील एक तुकडा पशुवैद्यकीय डॉक्टराकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला. पशुवैद्यकीय डॉ. टाकळीकर यांनी ही कातडी गाय, बैल व इतर जनावरांची असल्याचे सांगितले. ट्रक क्रमांक आरजे-०९-जीसी-१०७० वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोना गजानन ढाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसीम खाँ अब्दुल सलाम (रा. मागकडोन जि. उज्जैन मध्य प्रदेश) याच्याविरूद्ध महाराष्टÑ पशुसंवर्धन अधिनियम कायद्याअंतर्गत १ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि पांढरे करीत आहेत.