जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी ४ काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:36+5:302021-01-02T04:25:36+5:30
हिंगोली : कोरोनामुळे आमदारांच्या स्थानिक विकास निधीवरही टाच आली होती. यात पूर्वी प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाले होते. ...
हिंगोली : कोरोनामुळे आमदारांच्या स्थानिक विकास निधीवरही टाच आली होती. यात पूर्वी प्रत्येकी एक कोटी रुपये मिळाले होते. आता नव्याने प्रत्येकी एक कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात विधानसभेचे आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष बांगर, आ. राजू पाटील नवघरे हे तीन आमदार आहेत. तर विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे विप्लव बाजोरिया हे आमदार आहेत. मात्र, त्यांच्याकडे दोन जिल्हे आहेत. विधानसभेच्या आमदारांना आपल्या मतदारसंघात खर्च करण्यासाठी यापूर्वी प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळाला होता. मात्र, तो आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठीच खर्च करण्याचे बंधन होते. त्यात काही प्रमाणात हा निधी इतरत्रही वापरला गेला आता नव्याने एक कोटी मिळाले असून मतदार संघातील इतर कामांवर ते खर्च करता येणार आहेत. यात गाव पातळीवरील विविध समस्यांसह इतर कामांवर हा निधी खर्च करता येतो. आमदारांना तीन कोटी रुपयांचा एकूण निधी मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरीही आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्या मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आणखी एक कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
निवडून आल्यानंतर लागलीच कोरोनाचे संकट कोसळल्याने नव्यानेच निवडून आलेल्यांची मोठी अडचण झाली होती. दिलेली आश्वासने कशी पूर्ण करायची हा प्रश्न होता. मात्र, आता निधी मिळाल्यामुळे दिलेल्या आश्वासनांपैकी काही आश्वासने तरी पूर्ण करता येतील.
रस्ते विकास आणि पाणी नियाेजनावर भर
हिंगोली जिल्ह्यात आमदारांकडून देण्यात येत असलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने रस्ते, सामाजिक व सांस्कृतिक सभागृहे, संगणक आदी कामांना प्राधान्य दिले जाते. याशिवाय जेथे अडचण आहे तेथे पाणीपुरवठा, क्रीडा विकास, व्यायाम शाळा, ग्रंथालय आदींनाही निधी दिला जातो. अनेक गावांतून यासाठीच निधी मागणीही होते.
आमदारांच्या स्थानिक विकास निधीसाठी आता नव्याने प्रत्येकी १ कोटी रुपयांचा आदेश नुकताच प्राप्त झाला आहे. त्यात संबंधितांनी सुचविल्याप्रमाणे मतदारसंघातील गरजेनुरूप निकषात बसणाऱ्या कामांना निधी दिला जातो.
- किरण गिरगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी