वारंगाफाट्यावर दवाखान्यासह 4 दुकानांना भीषण आग; अकरा लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 03:02 PM2024-03-10T15:02:58+5:302024-03-10T15:03:42+5:30
मध्यरात्री दीड वाजेपासून चार वाजेपर्यंत लोकांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे १० मार्च मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एका दवाखान्यासह काही दुकानांना भीषण आग लागली. या आगीत जवळपास ११ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. १० मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक भंगार दुकान, टेलरिंगचे दुकान, मोबाईल शॉपी व दवाखान्याला अचानक आग लागली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस शिपाई प्रभाकर भोंग, होमगार्ड तसलीम प्यारेवाले यांना दुकानातून धूर निघत असल्याचे कळाले. जवळ जाऊन पाहिले असता आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी वारंगा येथे संपर्कात असलेल्या काही जणांना बोलावून घेतले. तेंव्हा राजेश्वर पतंगे व शेख सलीम हे घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील काही नागरिकांना फोन करून बोलावून घेतले व आजूबाजूच्या ठिकाणाहून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मध्यरात्री दीड वाजेपासून चार वाजेपर्यंत लोकांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. तेंव्हा कुठे आग आटोक्यात आली. आगीने रौद्ररूप धरण केले असल्यामुळे दवाखाना व दुकानांतील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये शेख निजाम शेख फकीरसाब यांच्या भंगारचे दुकानातील दोन लाखाचे सामान व त्यांच्याच गोदामातील दोन लाखांचे सामान असे एकूण ४ लाखाचे नुकसान झाले. तर डॉ. प्रदीप निवृत्ती नरवाडे यांच्या दवाखान्यातील विविध प्रकारचे साहित्य जळून चार लाखाचे नुकसान झाले. त्यांच्याच जागेमध्ये असणाऱ्या मोबाईल शॉपीचे अडीच लाख रुपयांचे नुकसान व हनुमंतराव नारायण सोनाळे यांच्या टेलरिंगच्या दुकानातील ३५ ते ४० ड्रेस व टेलरिंगचे साहित्य मिळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. वारंगाचे मंडळ अधिकारी पी. ए. काकडे व तलाठी बी. के. मोरे यांनी या घटनेचा पंचनामा केला. सर्वांचे मिळून ११ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
आग आटोक्यात आल्यानंतर अग्नीशामन गाडी आली...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अग्निशामन दलाला संपर्क साधला असता वसमत, हिंगोली, कळमनुरी व अर्धापूर या चारही ठिकाणचे अग्निशामनच्या सर्व गाड्या हिंगोली येथे मुख्यमंत्र्यांची सभा असल्याकारणाने उपलब्ध होणार नाहीत, असे सांगण्यात आले. दोन-तीनवेळा विनंती केली असता अखेर एक अग्निशामक दलाची गाडी वारंगाफाटा येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर आली, असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.