नवोदय परीक्षेपासून ५४ विद्यार्थी वंचित; पालक मागणार न्यायालयात दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:35 PM2020-01-13T20:35:47+5:302020-01-13T20:37:41+5:30
शाळेच्या चुकीमुळे ५४ विद्यार्थ्यांना हॉलतिकिटच मिळाले नाही.
कळमनुरी : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीत शाळेच्या चुकीमुळे ५४ विद्यार्थ्यांना हॉलतिकिटच मिळाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे पालकांनी सांगितले.
जवाहर नवोदय निवड चाचणी परीक्षेचा फॉर्म सबमिट न झाल्याने ५४ विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. १० जानेवारी रोजी जवाहर नवोदय निवड चाचणी घेण्यात आली. येथील म. ज्योतिबा फुले विद्यालयाच्या ५४ विद्यर्थ्यांचे परीक्षा फॉर्म नवोदयकडे सबमिट झाले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. शाळेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे पालकांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना हॉलतिकिट न मिळाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. या विद्यर्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आल्यास नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यामुळे पुन्हा या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. वर्षभर केलेला अभ्यास वाया गेला. विद्यर्थ्याच्या जीवनात प्रथमच परीक्षेसाठी हॉलतिकीट न आल्याने ते हादरून गेले. शाळेच्या या कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय व परीक्षेची सर्व कामे आॅनलाईन आहे. डिजिटल इंडियाच्या जमान्यात या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. किरकोळ चुकीमुळे हा प्रकार घडला. हॉलतिकिट आले नाही, आॅनलाईन परीक्षेचा फॉर्म स्वीकारण्याची ही पद्धत कितपत योग्य आहे, असा सवाल विद्यार्थी करीत आहे.
समन्वयाचा अभाव, वेगवेगळे तर्क
या प्रकरणाचे पुढे काय व्हायचे ते होईल; परंतु हे विद्यार्थी मात्र परीक्षेपासून वंचित राहिले. विद्यार्थ्यांचे चेहरे पडले असून पुढे काय होईल, या विवंचनेत विद्यार्थी आहेत. याबाबत नंतर शाळा प्रशासनही काही ठोस भूमिका घेवून पुढे आले नाही. पूर्वी नवोदयच्या परीक्षेवर शिक्षण विभागाचेच पूर्ण नियंत्रण असायचे. मागील काही काळापासून वसमतच्या नवोदय विद्यालयाचे नियंत्रण जास्त असते. त्यामुळे शाळांचा व प्रशासनाचा फारसा समन्वय राहात नाही. तर नवोदय विद्यालय प्रशासन असा समन्वय ठेवत नाही. त्यामुळे या प्रकारातूनही म.फुले विद्यालयाच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात आली नसावी, असेही सांगितले जात आहे. एकंदर या प्रकाराचे खापर कोणाच्या तरी माथी फुटेलही. मात्र यापैकी काही विद्यार्थी नवोदयासाठी पात्र ठरले असते तर त्यांना चांगल्या दर्जाचे शित्रण अल्पखर्चात मिळाले असते. त्यांचे तर या प्रकारात नुकसान झाले आहे. ते कसे भरून काढणार ? हा प्रश्न आहे.