रोजी गेली, तरीही गोरगरिबांना ४० हजार क्विंटल मोफत धान्यामुळे रोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:31 AM2021-04-20T04:31:04+5:302021-04-20T04:31:04+5:30
हिंगोली : कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने ...
हिंगोली : कोरोनामुळे ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने मोफत धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना ४० हजार क्विंटल धान्य मोफत मिळणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यभरात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहारावर निर्बंध घातले आहेत. याचा परिणाम दारिद्र्य रेषेखालील तसेच गरजू कुटुंबीयांवर होत आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अशा लाभार्थ्यांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ८७३ एकूण कार्डधारकांची संख्या आहे. अंत्योदय २९ हजार ६३८ कार्डधारक, तर प्राधान्य कुटुंबांची सदस्यसंख्या ७ लाख ५ हजार ८२४ एवढी आहे. यात अंत्योदयसाठी ६०९२ क्विंटल गहू व ३१५३ क्विंटल तांदूळ, तर प्राधान्य कुटुंबांसाठी १८८०७ क्विंटल गहू व १२५५० क्विंटल तांदूळ एवढे नियतन प्रतिमहिना मंजूर आहे.
तालुकानिहाय अंत्योदय कार्ड संख्या
हिंगोली - ७,७३९
कळमनुरी - ६,२३५
सेनगाव - ६,१८९
वसमत - ५,८४८
औंढा नागनाथ - ३,६२७
प्राधान्य कुटुंब योजनेत सभासदसंख्या
हिंगोली १,३९,००२
कळमनुरी १,३०,४३५
सेनगाव १,२६,५१८
वसमत १,८२,२१३
औंढा १,२७,६५६
जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांची संख्या
२९,६३८
लाभार्थींना काय मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यात एप्रिल व मे २०२१ या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी यापूर्वी नियमित मासिक नियतनाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात नियतन दिले. यात ज्यांनी या महिन्याचे धान्य आधीच खरेदी केले, त्यांना पुढील महिन्यात मोफत लाभ द्यायचा आहे, तर ज्यांनी खरेदी केले नाही, त्यांना मोफत द्यावयाचे आहे. तर एप्रिल व मे महिन्याचे एकदाच धन्य वितरणाची व्यवस्था ई-पॉश मशीनवर करण्यास शासनाने आदेशित केले.
शासनाने दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय चांगला असून, संचारबंदी काळात मदत होणार आहे.
- संतोष कोल्हे, (कामठा फाटा)
शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. यामुळे गरीब कुटुंबांना काही प्रमाणात लाभ मिळेल. परंतु, केवळ धान्य दिल्याने भागणार नसून आर्थिक मदतही देण्याची गरज आहे.
-महादेव धाबे, नर्सी नामदेव
शासन तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देणार असले तरी हाताला काम नसल्याने घर चालविणे आवघड झाले आहे. गहू, तांदूळ यांसह इतरही आर्थिक मदत दिली जावी.
-महादू नामदेवराव खराटे, कौठा