४१ टक्के बालकेच कुपोषणातून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:38 PM2018-12-08T23:38:10+5:302018-12-08T23:40:47+5:30
जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात बालग्रामविकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ४१ टक्के बालकेच सर्वसाधारण श्रेणीत आले आहेत. तर ४ बालकांनी हे केंद्रच सोडल्याने पुन्हा त्याच श्रेणीत राहिल्याचे दिसून येत आहे. तर आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची १४२९ बालके असल्याचे आढळून आले.
हिंगोली जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी शासनाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापनेसाठी निधी दिला होता. जवळपास ५0 लाखांपेक्षा जास्त निधी यावर खर्च झाला. यात तीव्र कुपोषित असलेली एकूण ४४४ बालके दाखल केली होती. कळमनुरी-२३, वसमत-१३४, हिंगोली-६१, सेनगाव-९१, औंढा ना.-१0९ तर आखाडा बाळापूर-२६ अशी प्रकल्पनिहाय बालकांची संख्या होती. यापैकी १८३ बालके तीव्रमधून कमी कुपोषित गटात आली होती. तर २१८ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यश आले होते. यामध्ये कळमनुरी-६, वसमत-८१, हिंगोली-३६, सेनगाव-४६, औंढा नागनाथ-४४, आखाडा बाळापूर-५ अशी बालकांची संख्या आहे. यात सर्वाधिक ६0 टक्के बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात वसमत प्रकल्पाला यश आले होते. तर बाळापूरचे सर्वांत कमी २0 टक्केच काम होते. कळमनुरीतील १ तर हिंगोलीची तीन बालके हे केंद्रच सोडून गेले. एनआरसीमध्ये ५ बालकांना दाखल केले होते. तर ३४ बालकांची कमी कुपोषणाच्या श्रेणीतून सुधारणा झाली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.
आॅक्टोबर महिन्यात पुन्हा तपासणी केली असता जिल्ह्यात पुन्हा कमी व तीव्र कमी वजन गटातील बालकांच्या संख्यात वाढ झालीआहे. त्यामुळे एकीकडे कुपोषणावर मात केली की, दुसरीकडे पुन्हा तेवढीच नवीन मुले या गर्तेत ढकलली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ९७ हजार २८४ बालकांचा सर्व्हे केला. यातील ७८ हजार ९७६ बालकांचे वजन घेतले. यापैकी ७0 हजार ११५ बालके सर्वसाधारण आढळली. यामध्ये कळमनुरी ५५७८, वसमत-१६0५४, हिंगोली-१२५५८, सेनगाव-१३७२७, औंढा ना.-१३१४८, आखाडा बाळापूर-९0५0 अशी संख्या आहे. तर ७४३२ बालके कमी वजन गटातील आहेत. यात कळमनुरी-५९१, वसमत-१४0५, हिंगोली-१५१३, सेनगाव-१४६६, औंढा-१५७९ तर आखाडा बाळापूर-८७८ अशी संख्या आहे.
तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या मात्र वाढली आहे. यात कळमनुरी १२८, वसमत-२१३, हिंगोली-३४७, सेनगावगफ़६८, औंढा ना.-२९२, आखाडा बाळापूर-१८१ अशी प्रकल्पनिहाय संख्या आहे. हे प्रमाण १.८१ टक्के आहे.