अवैध वाळू उपशाचा ४५ लाख दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:19+5:302021-07-08T04:20:19+5:30
हिंगोली : १ एप्रिल ते ३० जून २०२१ या दोन महिन्यांच्या काळातच अवैध गौण खनिज प्रकरणात तब्बल ५२ प्रकरणे ...
हिंगोली : १ एप्रिल ते ३० जून २०२१ या दोन महिन्यांच्या काळातच अवैध गौण खनिज प्रकरणात तब्बल ५२ प्रकरणे उघडकीस आली असून यापैकी ६ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात १.०६ कोटींचा दंड आकारला असून त्यापैकी ४५.२६ लाखांचा दंड वसूल केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करून शासनाच्या महसूलला कोट्यवधीचा चुना लावला जात आहे. प्रशासनाने कारवाई केल्यावर त्यांच्यावरच उलटण्याचे प्रकारही घडत आहेत. वाळू व्यवसायातील ही मुजोरी काही कमी होत नसून महसूलकडून अशीच कधीतरी मोहीम राबविली तरच कारवाई होते. अन्यथा बिनबोभाटपणे अवैध वाहतूक सुरू असते. यंदा मोठ्या प्रमाणात वाळू घाट लिलावात गेल्याने अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न राहणार नाही, असे चित्र होते. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. उलट काही भागात तर माफियांनी जाणीवपूर्वक घाट लिलावात जाणार नाही, याची काळजी घेतल्याचे सांगितले जाते. तर काही ठरावीक घाटातून होणारा अवैध उपसा कोणीच रोखू शकत नाही. त्यामुळे अशा घाटांना ही लिलावात पसंती मिळाली नाही. वसमत तालुक्यात तर माफियांनी गावोगाव मोठ्या प्रमाणात ढीग जमा करून ठेवले. त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेला प्रशासनास मुहूर्त सापडत नसल्याने लिलाव होईपर्यंत जागेवर वाळूचा एक खडाही राहतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही जणांनी ही जप्त वाळूही रात्रीच्या वेळी वाहन लावून पळविण्याचा सपाटा लावला आहे.
मागील काही दिवसांपासून पुन्हा वाळूचे दर भडकले आहेत. काहीजण ४० ते ५० हजार रुपयांना सहा ब्रासचे टिप्पर टाकत असून काहींनी तर यापेक्षाही जास्त रक्कम घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांधकाम करणाऱ्यांची गोची होत असल्याचे दिसत आहे. वाळू घाट लिलावात गेल्यानंतर काही दिवसांपर्यंत २५ हजारांपर्यंत हे टिप्पर मिळाले. त्या काळात बांधकाम सुरू केलेल्यांना पुरेसा साठा न केल्याने आता त्यांचे बजेट कोलमडले आहे.
तालुका प्रकरणे दंड वसूल, गुन्हे
हिंगोली २१ ३९.५९ २१.२० ६
सेनगाव ०४ ७.२० १.२९ ०
कळमनुरी २१ ४५.१६ ११.३७ ०
वसमत ५ ११.११ ८.१३ ०
औंढा १ ३.२७ ३.२७ ०
दंडाचे आकडे लाखात आहेत.
४८ वाहने केली जप्त
हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारी ४८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हिंगोली १२, सेनगाव १३, कळमनुरी १८, वसमत ५ अशी वाहनांची संख्या आहे. याशिवाय अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे जेसीबी अथवा इतर यंत्रसामुग्री ही ३ ठिकाणी जप्त केली आहे. कळमनुरी तालुक्यात ही कारवाई झाली.