जिल्ह्यातील ४५६२ कुटुंबांना ‘सौभाग्य’चा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:52 AM2018-07-18T00:52:18+5:302018-07-18T00:53:30+5:30
जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.
वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला २०१७ रोजी प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना म्हणजेच 'सौभाग्य' योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत केवळ शहरातच नव्हे, तर दुर्गम व अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्यांना वीजजोडणी दिली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी 'सौभाग्य'च्या माध्यमातून राज्यातील वीज न पोहचलेल्या कुटुंबांना २०१८ अखेरपर्यंत वीज जोडणी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुषंगाने सध्या जिल्ह्यात सौभाग्य योजनेचा गरजू कुटुंबियांना लाभ दिला जात आहे. सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरिबांच्या घरा-घरात वीजजोडणी देण्याचा संकल्प आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होवून रोजगारांच्या संधीत वाढ करण्याचा शासनाचा दृष्टिकोण आहे. योजनेअंतर्गत घरा-घरात वीज पोहचविणे हा उद्देश आहे. सौभाग्यच्या माध्यमातून महावितरण नांदेड परिमंडळातील अद्याप घरामध्ये वीज न पोहचलेल्या १० हजार ६०४ कुटुंबांना ११ दिवसांत वीजजोडणी दिली.
या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्र्य रेषेखालील कुटुंब) मोफत वीज जोडणीसोबतच नऊ वॅटचा एक एलईडी बल्ब आणि एक पिन पॉर्इंटफिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे. तर वीज जोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्र्य रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रूपयांमध्ये वीजजोड मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा हप्त्यांमध्ये भरावयाचे आहे. नांदेड जिल्ह्यातील वीज जोडणीपासून वंचीत २५ हजार ४३२ कुटुंबियांपैकी २ हजार ३५३ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली. तर परभणी जिल्ह्याातील ९ हजार ३२५ पैकी ३ हजार ६८९ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आली आहे.