लिंगी शिवारातून ४६ हजारांची गांजाची झाडे जप्त; हट्टा पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 07:03 PM2022-10-30T19:03:17+5:302022-10-30T19:03:25+5:30
ही कारवाई शनिवारी मध्यरात्री हट्टा पोलिसांनी केली.
इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली) : लिंगी शिवारात एका शेतातील कापसाच्या पिकात गांजाच्या झाडांचे संगोपन करण्यात आले होते. हट्टा पोलीस पथकाने शेतात छापा टाकून ४६ हजार २०० रुपयांच्या किमतीची ती झाडे जप्त केली. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री हट्टा पोलिसांनी केली.
वसमत तालुक्यातील लिंगी शिवारात शेतकरी केशव डांगरे (रा. पळशी) यांच्या गट क्र. १८१ शेतामध्ये असलेल्या कापसाच्या पिकात गांजाची झाडे संगोपन करण्यात आल्याची माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे यांना मिळाली. २९ ऑक्टोबर रोजी सपोनि गजानन बोराटे, फौजदार सतीश तावडे, सोनटक्के, भुजंग कोकरे, गणेश लेकुळे यांच्यासह पोलीस पथकाने लिंगी शिवारातील कापसाच्या पिकात छापा मारला. यावेळी ४६ हजार २०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली.
याप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात सपोनि गजानन बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम करीत आहेत. तालुक्यात गांजाची झाडे संगोपन केल्या जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. आठवड्यात हट्टा पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. याआधी औंढा, कुरुंदा पोलिसांनी गांजाप्रकरणी कारवाई केली आहे.