पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:59 PM2021-12-31T19:59:55+5:302021-12-31T20:00:08+5:30

महिलेवर चाकूहल्ला, मुलांनाही बांधून ठेवत घरात डांबले

4.62 lakh was looted at gunpoint in hingoli | पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला

पिस्तुलाच्या धाकावर दिवसाढवळ्या ४.६२ लाखांचा ऐवज लुटला

Next

हिंगोली : तीन मुलांसह घरात एकट्याच असलेल्या महिलेवर चाकूहल्ला करून पिस्तुलाने मुलांना मारण्याची धमकी देत रोख रकमेसह साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बियाणीनगर भागात घडली. भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने हिंगोलीकर हादरले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कार्यरत असलेले अविनाश कल्याणकर यांच्या घरी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. पार्सल आल्याचे समजून दरवाजा उघडला असता दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरी अविनाश यांच्या पत्नी अंजली व मुले दिव्यराज, प्रत्युष आणि श्रीशा हे होते. यापैकी एकाकडे पिस्तूल तर दुसऱ्याकडे चाकू होता. एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड व दागिने देण्यासाठी धमकावले. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता अंजली यांच्या उजव्या हातावर चाकूने वार केला. त्यानंतर अंजली यांनी सोने व दागिने असलेले कपाट दाखविले.

दोन लाखांचा पोहे हार, दोन लाखांचे नेकलेस, कानातील टॉप्स, २० हजारांची अंगठी, दोन मुलांचे गल्ले व इतर रोख, असा एकूण ४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला. तसेच इतर काही असेल तर सांग, नाहीतर मुलांना मारू अशी धमकी दिली. त्यानंतर किचनमधील दीड ते दोन हजारांची रक्कमही काढून घेतली. बेडरूममध्ये अंजली यांच्या रडण्याचा आवाज येत असल्याने मुलगा दिव्यराज बाहेरून दरवाजा वाजवत होता. मात्र, जाताना पुन्हा घरझडती घेऊन काहीतरी चोरट्यांनी बॅगमध्ये भरले. त्यानंतर अंजली व त्यांचा मुलगा दिव्यराज यांना बांधून तेथेच डांबून टाकले. तर, त्यांचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. वाशिम रोडवर एके ठिकाणी हा मोबाइल फेकून दिल्याचे सांगितले जात आहे. ही घटना कळल्यानंतर अंजली यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, शहरचे पंडित कच्छवे यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी श्वान पथकालाही पाचारण केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अंजली यांचा जबाब नोंदवून घेत होते.

Web Title: 4.62 lakh was looted at gunpoint in hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.