विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण
By विजय पाटील | Published: August 27, 2022 12:16 PM2022-08-27T12:16:26+5:302022-08-27T12:19:31+5:30
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
हिंगोली : येथील गड्डेपीर गल्लीतील विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील दानपेट्या उघडून त्यातील रक्कमेची तीन दिवस मोजदाद करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ लाख रुपये निघाले आहेत.
या मंदिराच्या दानपेट्या मागील अनेक दिवसांपासून उघडण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या पेट्या भरल्याने भाविकांना दान देण्यासाठी अडचण येत होती. आगामी काळात या ठिकाणी मोठा उत्सव असतो. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या मोदकोत्सवाला तर ५० हजारांवर भाविक येथे दर्शनासाठी येतात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे भाविकांना येथे येता आले नाही.
यंदा मात्र गर्दी उसळणार असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातच नव्हे, तर परराज्यातही या गणपतीची ख्याती पसरली आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांकडून यंदा तयारी सुरू आहे. या काळात भाविकांना दान करता यावे, यासाठी दानपेट्याही रिकाम्या केल्या आहेत. त्यात तीन दिवस केलेल्या मोजणीत ४८ लाख ३८ हजार ५०० रुपयांची रक्कम निघाली आहे. ती बँकेत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हि सर्व रक्कम मोजण्यासाठी विश्वस्त मंडळ, भाविक आणि सहाय्यक धर्मदायुक्त कार्यालयाचे अधिकारी यांनी परिश्रम घेतले.