‘त्या’ शाळांचे ४९ % विद्यार्थी इंग्रजीला गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:13 AM2018-03-09T00:13:53+5:302018-03-09T00:14:05+5:30
तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोचली आहे.
तालुक्यातील कापडसिनगी येथील रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व संत गजानन विद्यालय या दोन विद्यालयांत कोणत्याही भौतिक सुविधा नसताना तब्बल ६९४ विद्यार्थ्यांचे दहावीला प्रवेश झाले होते. एवढ्या विद्यार्थीसंख्येमुळे परीक्षा केंद्राचा प्रश्न निर्माण झाला होता. सेनगावात येवले विद्यालय व शिवाजी विद्यालयात केंद्र दिले. त्यामुळे आधीच अनेकांनी काढता पाय घेतला. हिंदी विषयाच्या पेपरला ३८ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. गुरुवारी इंग्रजीच्या पेपरला तर विक्रमी ४९ टक्के विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसली. शिक्षणाधिकारी दीपक चवळे हेच केंद्रावर तळ ठोकून असून कॉपीला थारा दिला जात नसल्याने गणित बिघडले आहे. शिवाजी माध्यमिक विद्यालयात एकूण २९८ पैकी १४५ विद्यार्थांनी पेपर दिला तर १५५ विद्यार्थी गैरहजर होते. येवले विद्यालयात एकुण ३९२ पैकी २०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १८५ विध्यार्थी गैरहजर होते. दोन्ही विद्यालयात गैरहजर विद्यार्थांची टक्केवारी ४९ टक्के म्हणजे निम्मे विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. हा प्रकार लक्षात घेता पासिंग सेंटरच्या मुळावरच घाव बसल्याचे दिसून येत असून पुढे खरेच यात काही कारवाई होईल का, हा प्रश्नच आहे.